मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वळण घेण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेनं चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी अलीकडेच एकमेकांप्रती सकारात्मक पावलं उचलली आहेत, ज्यामुळे या चर्चा अधिकच गडद झाल्या आहेत.
एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनीही तितक्याच उत्स्फूर्ततेने प्रतिसाद दिला. या साध्या परंतु महत्त्वपूर्ण क्षणामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या संभाव्य युतीबाबत सकारात्मक मत व्यक्त केलं आहे.
आजच्या सामना अग्रलेखातूनही याच विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. अग्रलेखात भाजपवर तीव्र टीका करताना, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भात “महाराष्ट्राला आणखी काय हवे?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. भाजपचं राजकारण ‘वापरा आणि फेका’ पद्धतीचं असल्याचा आरोप करत, या पक्षाने महाराष्ट्रात विषारी वातावरण निर्माण केल्याचं म्हटलं गेलं आहे.
राज ठाकरे यांचं राजकारण अनेकदा वळणं घेणारं राहिलं आहे. त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली. सुरुवातीला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभला, परंतु पुढे पक्षाला ओहोटी लागली. भाजप आणि काही संघटनांनी राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर टीका सुरू ठेवली, पण त्यातून मनसेला फारसा राजकीय लाभ झाला नाही. उलट, मराठी जनतेच्या एकजुटीला धक्का बसला.
राज ठाकरे यांनी अलीकडील मुलाखतीत सांगितले, “झाले ते झाले. कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद किरकोळ आहेत. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येणं फार आवश्यक आहे. फक्त इच्छेचा प्रश्न आहे.” त्यांच्या या वक्तव्याने आगामी काळात राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या भविष्यासाठी मराठी नेते एकत्र येण्याची ही एक ऐतिहासिक संधी ठरू शकते. राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं केवळ राजकारणासाठी नव्हे, तर मराठी जनतेच्या आत्मसन्मानासाठीही महत्त्वपूर्ण ठरू शकतं










