येवला । येवला तालुक्यासह मराठवाडा आणि चांदवड भागासाठी जलसंजीवनी ठरणार्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी आता दरसवाडी डोंगरगाव कालव्यामार्फत येवल्यात खळाळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते दरसवाडी धरणातून कालव्याला जलपूजन करून पाणी सोडण्यात आले. या उपक्रमामुळे येवला तालुक्यातील सर्व बंधार्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.
मांजरपाडा प्रकल्पाच्या परिसरात गेल्या आठवड्याभरात जोरदार पावसामुळे पुणेगाव धरणातून दरसवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाला. परिणामी दरसवाडी धरण भरून गेले असून, ते ओव्हरफ्लो झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली दिलीप खैरे यांच्या हस्ते पाण्याचा कालव्यात प्रवाह सुरू करण्यात आला.
या जलपूजन सोहळ्यास राष्ट्रवादी जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. मोहन शेलार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, सुनिल पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, अंबादास पगार, राजेंद्र शेलार, सागर पगार, अरुण ठोंबरे, अशोक गोडसे, योगेश खैरनार, दत्तू शेलार, जालिंदर शेलार, रविंद्र शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रकल्पाचे स्वप्न साकारतेय
मंत्री छगन भुजबळ यांनी साकारलेला मांजरपाडा प्रकल्प हा केवळ एक सिंचन योजना नसून, संपूर्ण मतदारसंघासाठी आणि परिसरातील जनतेसाठी एक जीवनरेखा ठरतो आहे. आज या प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे सुरू झाल्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.







