नाशिक । जून महिन्यात नाशिमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने आतापर्यंत नाशिकमधून १३ हजार दशलक्ष घनफूट इतके पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातही मोठया प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे.
यंदाच्यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाचे आगमन झाले मे महिन्यात १८७ मिलीमीटर इतका पाऊस पडला.तर जून महिन्यात ३६८ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. त्यामूळे २० जूनपासूनच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
यामुळे गोदावरीला यंदाच्या मोसमातील पहिला पूर आला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
या पावसामुळे जिल्हयातील धरणसाठाही पन्नास टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचला आहे. जर जायकवाडी धरणात ६५ टक्के साठा उपलब्ध झाला तर वरच्या धरणातून म्हणजेच नाशिक, अहिल्यानगर जिल्हयातून पाणी सोडण्याची आवश्यकता राहत नाही.
त्यामुळे दरवर्षी नाशिकमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या मुददयावर वाद निर्माण होतो.
परंतू, पावसाळयात वाहून जाणार्या पाण्याची आकडेवारी याबाबत गृहीत धरली जात नसल्याने नेहमी वाद बघायला मिळतो. यंदा तर जून महिन्यातच १३ हजार दशलक्ष घनफुट इतके पाणी नाशिक जिल्हयातून जायकवाडीच्या दिशेने झेपावल्याने मराठावाडयातील नागरीकांसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
गंंगापूर धरणातून विसर्ग वाढवणार
पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातून सध्या १३६० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र धरण परिचलन सूचीनूसार आता पुन्हा यात वाढ करण्यात आली असून दुपारी ४ वाजता यात वाढ करून आता २१३२ क्युसेक इतका विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरीकांना सर्तकतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्याच तात्काळ हलवण्यात यावे असेही सूचित करण्यात आला आहे.








