नाशिक शहर भोंगेमुक्त होण्याच्या मार्गावर; पोलिस प्रशासनाने घेतली ही भूमिका

नाशिक । नाशिक शहरात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या बहुतांश भोंग्यांवर कारवाई करण्यात आली असून, उरलेले भोंगेही येत्या आठवडाभरात हटवले जातील, असा विश्वास भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी व्यक्त केला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी भेट घेतल्यानंतर सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सोमय्या यांनी सांगितले की, मुंबईनंतर आता नाशिकही भोंगेमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. शहरातील भोंगे हटवण्यास सुरुवात झाली असून, सध्या भोंग्यांमधून होणारा आवाज १०० टक्के थांबवण्यात आलेला आहे. उरलेले भोंगेही आठवडाभरात हटवले जातील, अशी ग्वाही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील इतर शहरांनाही भेटी
सध्या भोंगे आणि ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी भाजपकडून राज्यव्यापी दौरा सुरू असून, सोमय्या यांनी याआधी छत्रपती संभाजीनगर व अन्य शहरांनाही भेटी दिल्या आहेत. पुढील काही दिवसांत ते मीरा भाईंदर, पुणे आणि इतर शहरांतील पोलीस आयुक्तांशीही यासंदर्भात चर्चा करणार आहेत.

कायद्याची अंमलबजावणी गरजेची
सोमय्या म्हणाले की, देशात रात्री १० नंतर आणि सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्यास बंदी आहे. मात्र, काही सण-उत्सवांच्या वेळी प्रशासनाला कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष परवानगी द्यावी लागते. मात्र, भोंग्यांचा अतिरेकी वापर आणि दुरुपयोग थांबवणे ही काळाची गरज आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मालेगाव स्फोट प्रकरणावरून गांधी कुटुंबावर टीका
या दौर्‍यात मालेगाव स्फोट प्रकरणावरून किरीट सोमय्या यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरही घणाघात केला. मालेगाव स्फोट प्रकरणातील निकालाने हे स्पष्ट झाले आहे की खरे दोषी कोण होते याचा शोध घेण्याऐवजी काँग्रेसने हिंदूंना अतिरेकी ठरवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणावरून गांधी कुटुंबाने धडा घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसने लव्ह जिहाद, वोट जिहाद यासारख्या मुद्द्यांचा वापर निवडणुकीत केला, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली आहे. देश आता अशा राजकारणाला नकार देत असल्याचे ते म्हणाले.

error: Content is protected !!