नाशिकमध्ये कुठे यलो तर कुठे ऑरेंज अलर्ट, वाचा कसे असेल हवामान

नाशिक – नाशिक शहर आणि जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. सायंकाळपर्यंत शहरात २० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयातील घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शहरात सायंकाळी ७ वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ७ जुलै रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामानातील बदलामुळे पश्चिम बंगालच्या उत्तर-पूर्व भागात चक्राकार स्थिती निर्माण झाली असून, ती महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीकडे झुकत आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः ६ आणि ७ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मे महिन्यापासून नाशिकमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. परिणामी, धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून, आजूबाजूच्या भागातून येणारे पाणीही गोदावरी नदीत मिसळत आहे. यामुळे दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

रस्ते खराब, वाहतूक कोंडी
महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचा अभाव स्पष्ट दिसत असून, अनेक भागांत पाणी साचले आहे. शहरातील रस्ते खड्ड्यांनी भरले असून, या खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

धरणांमधून पाण्याचा विसर्ग (क्युसेक्समध्ये):
गंगापूर – ३७१६
दारणा – ६६४२
होळकर पूल – ४०९१
नांदूर मध्यमेश्वर – १२६२०
पालखेड – ६७८
भोजापूर – ३८
भावली – ५८८
भाम – ५५९

error: Content is protected !!