कृषी खात्याची ऑफर मिळाली होती: छगन भुजबळ यांचा खुलासा

नाशिक । राज्य सरकारमध्ये मंत्रीपदांच्या वाटपावरून सध्या चर्चांना उधाण आले असताना, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कृषी विभागाची जबाबदारी स्वीकारण्याची ऑफर दिली होती. अजित पवार माझ्याकडे आग्रहाने म्हणाले की कृषी खाते चांगलं आहे, आणि तुम्ही ते सांभाळा, असे भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

भुजबळ म्हणाले की, २०२२ मध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाल्यानंतर खातेवाटपाच्या वेळी अर्थखाते अजित पवार यांनी घेतले होते आणि उर्वरित विभाग त्यांच्यासमोर ठेवण्यात आले होते. “तुम्हाला हवे ते खाते निवडा,” असे पवार यांनी सांगितल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, विधीमंडळात रमी गेम खेळल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांनी तीव्र टीका केली होती. त्यामुळे त्यांच्याकडून कृषी खाते काढून त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभाग देण्यात आला आहे.

दत्ता भरणे यांच्याकडून अपेक्षा
नवीन कृषी मंत्री म्हणून दत्ता भरणे यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत भुजबळ म्हणाले की, “भरणे हे ग्रामीण पार्श्वभूमीचे आहेत आणि त्यामुळे ते कृषी खात्याला न्याय देतील. अशा माणसांना शेतकर्‍यांच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे समजतात असेही भुजबळ म्हणाले.

पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह
मालेगाव बॉम्बस्फोट निकालाप्रकरणी बोलतांना भुजबळ यांनी अलीकडील काही खटल्यांचा संदर्भ देत पोलीस तपासावरही शंका व्यक्त केली. “काही आरोपी १५ ते १७ वर्षे तुरुंगात राहतात आणि नंतर त्यांना निर्दोष ठरवले जाते. हा अन्याय आहे. मी स्वतःही सव्वादोन वर्ष तुरुंगात होतो. हा त्रास फक्त मानसिक नाही, तर आर्थिक आणि सामाजिकही असतो,असे त्यांनी सांगितले. न्यायप्रक्रियेत सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!