पुणे । एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये 27 जुलैच्या पहाटेच्या सुमारास सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी धाड टाकली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.
प्राथमिक तपासात पोलिसांनी पार्टीत मद्यप्राशन आणि अंमली पदार्थांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. अटक करण्यात आलेल्यानंतर सातही जणांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. अंमली पदार्थांचे सेवन झाले आहे का, हे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
पार्टी ज्या फ्लॅटमध्ये झाली होती, त्या ठिकाणचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केला असून 25 जुलैला देखील अशाच प्रकारची पार्टी झाली असल्याचा पोलिसांचा दावा आहे. प्रांजल खेवलकर यांनी चार दिवसांसाठी फ्लॅट बुक केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी 25 जुलैच्या पार्टीचीही चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी पतीवर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी भेट घेण्याचे ठरवले होते. मात्र ही भेट अचानक रद्द करण्यात आली. पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांना कळवले की रोहिणी खडसे यांना वेळेत पोहोचता आले नसल्याने ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
प्रांजल मनिष खेवलकर (41)
निखिल जेठानंद पोपटाणी (35)
समीर फकीर महमंद सय्यद (41)
सचिन सोनाजी भोंबे (42)
श्रीपाद मोहन यादव (27)
ईशा देवज्योत सिंग (23)
प्राची गोपाल शर्मा (22)










