नाशिकला यलो अलर्ट, पुढील पाच दिवस कसा आहे हवामानाचा अंदाज

नाशिक । गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्हयाला अवकाळी पावसाने तडाखा दिला. मे महिन्याच्या सुरूवातीलाच अवकाळीने तडाखा दिल्याने नाशिकमध्ये कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवार (दि.८) मे रोजीही अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुढील तीन दिवस म्हणजे १२ मे पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी आणि गारपीट झाल्याने उन्हाळी पिकांचे, फळबागांचे आणि कांद्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. आज ८ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात गारपीटीचा धोका कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे तर संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील १७ जिल्हयांमध्ये मात्र, अवकाळीची शक्यता १२ मे पर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार, पालघर, जळगाव, नाशिक, नगर या ९ जिल्हयांमध्ये अवकाळी प्रभाव कायम टिकून राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अवकाळी वातावरणामुळे पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ६ डिग्रीने घट झाली आहे त्यामुळे रात्री उकाडयापासून दिलासा मिळत आहे.

नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे १९०० हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले. अवकाळीने सर्वाधिक ७८६.२० हेक्टरवरील कांदापिकाची हानी झाली आहे. तसेच ५२४.३० हेक्टरवरील आंबा, ३३३ हेक्टरवरील भाजीपाला, १४०.६ हेक्टवरील डाळींबाचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त टोमॅटोचे ४५.५० हेक्टरचे क्षेत्र, ८५ हेक्टरवरील कांदारोपवाटिका, गहु तसेच अन्य पिकांचे नुकसान झाले आहे.

२९९ घरांची पडझड
वादळी वारे तसेच अवकाळी पावसाने जिल्ह्यात मालमत्तांची हानी झाली आहे. पंधराही तालुक्यात २९९ घरांची अंशत: पडझड झाली असून पोल्ट्री शेड व जनावरांच्या गोठ्याचेही नुकसान झाले आहे. याशिवाय लहान ७ व मोठे १ जनावर दगावले आहे. अन्य चार मालमत्तांची हानी झाल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे.

error: Content is protected !!