मुंबई । १ ऑगस्टपासून UPI व्यवहार करणार्या लाखो वापरकर्त्यांसाठी काही नवे नियम लागू होणार आहेत. भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स महामंडळ (NPCI) ने हे बदल जाहीर केले असून, UPI व्यवहार सुरक्षित, वेगवान आणि अधिक कार्यक्षम होण्यासाठी हे पावले उचलण्यात आली आहेत.
बॅलन्स तपासण्यावर मर्यादा
सध्या अनेक वापरकर्ते दिवसातून अनेक वेळा बॅलन्स चेक करतात, जे NPCI च्या मते सिस्टमवर अनावश्यक ताण निर्माण करते. त्यामुळे आता दिवसातून फक्त ५० वेळाच बॅलन्स तपासणे शक्य होईल.
तसेच, फोन नंबरशी लिंक असलेली बँक खाती दिवसातून फक्त २५ वेळा तपासता येणार आहेत. यामुळे बँकिंग प्रणालीवरचा लोड कमी होऊन व्यवहार अधिक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
AutoPay व्यवहारांसाठी निश्चित वेळापत्रक
UPI AutoPay म्हणजे सब्स्क्रिप्शन, EMI, युटिलिटी बिल्स यांसारखे पूर्वनियोजित व्यवहार – हे आता कोणत्याही वेळेस न होता ठराविक वेळेतच प्रोसेस होतील.
AutoPay व्यवहारासाठी वेळा निश्चित
सकाळी १० वाजण्यापूर्वी
दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत
रात्री ९:३० नंतर
या वेळेपलीकडे AutoPay व्यवहार होणार नाहीत. त्यामुळे संबंधित व्यवहारांची योजना ही या वेळापत्रकानुसार करावी लागेल.
सामान्य UPI व्यवहारांवर परिणाम नाही
यामध्ये नेहमीचे पैसे पाठवणे, QR कोड स्कॅन करणे, किंवा बँकेकडून पैसे प्राप्त करणे यावर कोणताही परिणाम होणार नाही. हे व्यवहार पूर्वीप्रमाणेच सतत चोवीस तास उपलब्ध राहतील.










