त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी; दर्शनासाठी लागतोय ७ तासांचा वेळ

नाशिक – श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी पहाटेपासूनच पाहायला मिळत आहे. मंदिरात विविध महापूजा व आरत्या सुरू असून, दर्शनासाठी मंदिराचे वेळापत्रकही विशेष ठेवण्यात आले आहे. पहाटे ४ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे.

आजच्या श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे ४० ते ५० हजार भाविकांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिली आहे. साधारण रांगेतून दर्शन घेण्यासाठी ६ ते ७ तास लागण्याची शक्यता असून, भाविकांच्या सुविधेसाठी पूर्व दरवाज्याजवळ वातानुकूलित रांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी व आरोग्य कक्ष यांची सुविधा करण्यात आली आहे.

श्रावणातील गर्दी लक्षात घेता गर्भगृह दर्शन सर्वसामान्य भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ग्रामस्थांसाठी मात्र, सकाळी ४ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, यासाठी ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. त्याचप्रमाणे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.

असे आहे त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्त्व
सह्याद्रीच्या कुशीत, गोदावरी नदीच्या उगमाजवळ वसलेले त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे ब्रह्मगिरी पर्वत, कुशावर्त तीर्थ व निवृत्तीनाथ महाराजांची समाधी ही पवित्र स्थळं आहेत. पौराणिक कथांनुसार, गौतम ऋषींच्या तपश्चर्येमुळे महादेव प्रसन्न झाले व त्रिमूर्तीस्वरूप ज्योतिर्लिंग येथे प्रकट झाले. त्र्यंबकेश्वरचे शिवलिंग हे इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळे असून त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीकात्मक दर्शन एकत्र होते. श्रावणात एकदा का त्र्यंबकेश्वरचे दर्शन झाले, तर ते महापुण्य लाभ देणारे मानले जाते. त्यामुळेच आजच्या दिवशी भाविकांच्या भक्तिभावाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.

आज पहिल्याच श्रावणी सोमवारी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांना दर्शन रांगेत उभे राहता यावं याकरता निवारा शेड उभारण्यात आलेले आहेत. मंदिर पहाटे 4 ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहील.

पुरुषोत्तम कडलग,त्र्यंबकेश्वर देवस्थान

error: Content is protected !!