महिला कर्मचारी छळ प्रकरण – अधिकार्‍यावर कारवाई, चौकशी अंतिम टप्प्यात

नाशिक । नाशिक जिल्हा परिषदेमधील महिला कर्मचार्‍यांवर झालेल्या कथित छळ प्रकरणाची चौकशी सध्या जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीमार्फत सुरू असून, येत्या दोन ते तीन दिवसांत चौकशीचा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्हा परिषदेमध्ये एका विभागप्रमुखावर महिला कर्मचार्‍यांच्या मानसिक व लैंगिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले असून, सध्या या प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना एक निनावी तक्रार अर्ज व पेन ड्राइव्ह टपालाद्वारे प्राप्त झाली होती.

तक्रारीत संबंधित अधिकार्‍याने कामाचा धाक दाखवून आणि विविध आमिषे दाखवून महिला कर्मचार्‍यांवर दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच, पुराव्यांच्या स्वरूपात ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स, आक्षेपार्ह चॅटिंगचे स्क्रीनशॉट आणि मेसेजेसही सादर करण्यात आले.

या तक्रारीची माहिती मुख्यालयात समजताच अन्य महिला कर्मचार्‍यांनीही पुढे येत आपले अनुभव मांडले असून, एकूण तक्रारींची संख्या ३० च्या आसपास गेल्याचे सूत्रांकडून समजते.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत विशाखा समितीकडे चौकशी सोपवली आहे. समितीने तक्रारदार महिलांची सविस्तर बाजू ऐकून घेतली असून, नंतर प्रकरण राज्य महिला आयोगाच्या अंतर्गत समितीकडे (IC समिती) पाठवले गेले आहे.

आता ‘आयसी’ समितीचा अहवाल मिळण्याची प्रतीक्षा आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याचे महिला आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणात फक्त एकाच अधिकार्‍याचा सहभाग आहे की आणखी कोणी कर्मचारी त्याला पाठीशी घालत होते, याचाही तपशील अहवालातून स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषदेमध्ये या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून, महिला कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने यावर कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.


संपूर्ण प्रक्रिया गोपनीय असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिक काही बोलणे योग्य नाही. निनावी तक्रारीच्या आधारे ही चौकशी सुरू करण्यात आली असून, एका वरिष्ठ अधिकार्‍याविरोधात ८ ते १० महिला कर्मचार्‍यांनी तक्रार केली आहे. तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित अधिकार्‍याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.या संपूर्ण प्रकरणाची माहिती राज्य महिला आयोग व ग्रामविकास मंत्री यांनाही देण्यात आली आहे. नाशिक जिल्हा परिषदेत अशा स्वरूपाचे प्रकरण पुढे आल्याने कर्मचारी वर्गात खळबळ उडाली असून, चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, नाशिक

error: Content is protected !!