अजित पवार गटात प्रवेशाबाबत खडसे स्पष्टच बोलले

जळगाव । जळगावमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी शरद पवार गटाचा त्याग करून अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या घडामोडीनंतर अजून काही मातब्बर नेते अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. यामध्ये एकनाथ खडसे यांचेही नाव पुढे आले.

मात्र आता स्वतः एकनाथ खडसे यांनी या चर्चांवर पूर्णविराम देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खडसे म्हणाले, अजित दादांच्या गटात जळगावातील काही नेतेमंडळी गेले, ज्यांना जायचे होते ते गेले, आणि जे आमच्या सोबत आहेत, तेच खरे कार्यकर्ते आहेत. आता अजून कोणी जाणार असे मला वाटत नाही. आम्ही पवार साहेबांसोबतच आहोत.

त्या वेळीही नाही गेलो, आताही नाही जाणार

एकनाथ खडसे यांनी यापूर्वीही अजित पवार गटात जाण्यासाठी संपर्क झाला होता, याचेही खुलासेपूर्वक सांगितले. जेव्हा अजित दादा वेगळे झाले, त्याच वेळी मला देखील संदेश आला होता की, तुम्ही आमच्यासोबत या. मात्र मी तेव्हाही गेले नाही आणि आताही जाणार नाही. मी कायम शरद पवार साहेबांसोबत राहिलो आहे आणि पुढेही राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पवार साहेबांचे निर्देशच आमच्यासाठी अंतिम

खडसे यांनी कार्यकर्त्यांना संदेश देत सांगितले, अशा अफवांकडे दुर्लक्ष करून पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रित करा. पवार साहेब जे निर्णय घेतील, त्यानुसारच माझाही निर्णय असेल. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही पुढे जाणार आहोत. एकनाथ खडसे यांच्या या ठाम भूमिकेमुळे त्यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, शरद पवार गटात ते आपल्या निष्ठेवर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

error: Content is protected !!