कोविडचे नवीन चार प्रकार, महाराष्ट्र किती रूग्ण ?

मुंबई । देशभरात कोविड-19 च्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असून सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200 वर पोहोचली आहे. यामध्ये केरळ सर्वाधिक प्रभावित असून तेथे 430 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर असून येथे एकूण 325 रुग्ण आहेत. विशेष म्हणजे यापैकी 316 रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. कोविडचे नवे चार प्रकार आढळले असून नागरीकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी एकाच दिवशी महाराष्ट्रात 66, कर्नाटकात 36, गुजरातमध्ये 17, बिहारमध्ये 5, तर हरियाणामध्ये 3 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशातही दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यातील एकीला सौम्य ताप आणि खोकला आहे, तर दुसरी महिला लक्षणविरहित आहे.

कोविडचा नवा प्रकार
फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) येथे 78 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून, राज्यात नव्या कोविड प्रकारामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. याशिवाय महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात मिळून आणखी 11 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे.

केरळ आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी दोन मृत्यू
26 मे रोजी जयपूरमध्ये एका रेल्वे स्थानकावर आढळलेल्या मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरा मृत्यू खाजगी रुग्णालयात दाखल 26 वर्षीय टीबीग्रस्त तरुणाचा झाला आहे. महाराष्ट्रातील ठाणे येथेही दोन मृत्यूंची नोंद झाली असून, त्यामध्ये एक महिला आणि एक 21 वर्षीय युवक यांचा समावेश आहे. कर्नाटकात 84 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 17 मे रोजी झाला होता, ज्याचे कोविड रिपोर्ट 27 मे रोजी पॉझिटिव्ह आले.

चार नवीन कोविड प्रकारांची नोंद
कोविडच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेत भर टाकणारी गोष्ट म्हणजे देशात चार नवीन प्रकार आढळले आहेत – LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1. हे प्रकार विशेषतः दक्षिण आणि पश्चिम भारतातून आढळले आहेत. आयसीएमआरचे संचालक डॉ. राजीव बहल यांनी सांगितले की, ही प्रकरणे गंभीर नसली तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. जागतिक आरोग्य संघटनेनेही या प्रकारांना “निगराणीखाली असलेले” वर्गात ठेवले आहे.

JN.1 सर्वाधिक सामान्य प्रकार
भारतात सर्वाधिक आढळणारा प्रकार म्हणजे JN.1, जो चाचणी केलेल्या अर्ध्याहून अधिक नमुन्यांमध्ये आढळतो. त्यानंतर BA.2 (26%) आणि ओमिक्रॉन सबलाइनेज (20%) हे प्रकार आहेत. NB.1.8.1 या प्रकारात A435S, V445H आणि T478I अशी स्पाइक प्रोटीन म्युटेशन्स असून, हा प्रकार जलद गतीने पसरतो आणि पूर्वी तयार झालेल्या प्रतिकारशक्तीवर त्याचा परिणाम होत नाही.

सावध रहा, घाबरू नका
कोरोना पुन्हा डोके वर काढत असला तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र नागरिकांनी मास्कचा वापर, हात धुणे, गर्दीपासून दूर राहणे अशा प्राथमिक खबरदारी उपाययोजना नक्कीच सुरू ठेवाव्यात. प्रशासनाकडूनही सतर्कता बाळगली जात असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

error: Content is protected !!