नाशिक | विरोधकांच्या सलग मोर्चांनंतर सत्ताधारी भाजपचे नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री सेवा पंधरवाडा आणि समृध्द पंचायत राज अभियानाच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत.
गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोर्चांच्या माध्यमातून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचार, शेतकरी प्रश्न आणि स्थानिक विकासकामांबाबत सातत्याने निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीने तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्ला चढवत देवा भाऊ नव्हे हे तर मेवाभाऊ असा हल्ला चढवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले.
या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्या नाशिक दौर्याला विशेष महत्व आले आहे. ते विरोधकांच्या आरोपांना कोणते उत्तर देतात आणि भाजपची भूमिका कशी मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकमधील राजकीय वातावरण विरोधकांच्या मोर्चामुळे तापलेले असतानाच गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमुळे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.











