नाशिक । मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी नाशिक दौर्यावर आले होते. दोन तासांच्या या दौर्यात राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकार्यांशी चर्चा केली. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या दौर्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. मात्र, मुंबईत एक फोन आला अन राज ठाकरे तडक पुणे दौरा रदद करून मुंबईकडे रवाना झाले.
राज ठाकरे यांचा यापूर्वी दोन वेळ रदद झालेला दौरा अखेर ठरला. त्यानूसार सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास राज ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमनही झाले. राज ठाकरे यांचे आगमन होताच पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. स्वागत स्विकारून राज ठाकरे तडक हॉटेलच्या आपल्या रूममध्ये गेले.
साहेब पदाधिकार्यांशी चर्चा करतील या आशेने साहेबांचे विचार ऐकण्यासाठी मनसैनिकांनी हॉटेलच्या सभागृहात गर्दी केली. मात्र बराच वेळ उलटूनही साहेब काही येईना. अखेर एक संदेश आला अन साहेब कार्यकर्त्यांशी चर्चा करणार नसल्याचे समजले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार राज ठाकरे यांनी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, सलीम शेख यांच्यासमवेत चर्चा केली. मनसेच्या नाशिक कार्यालयाच्या नुतनीकरण कामाचे उदघाटन ५ जून रोजी संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले.
राज ठाकरे यांच्या नियोजित कार्यक्रमानूसार ते नाशिक येथून सायंकाळी पुणे येथे बैठकीसाठी जाणार होते. मात्र मुंबईतून एक कॉल आला अन राज ठाकरे यांनी पुणे दौरा रदद करत मुंबईकडे निघण्याचे फर्मान आपल्या सोबतच्या सहकार्यांना दिले. त्यामुळे राज ठाकरे अवघ्या दोन तासांत नाशिकचा दौरा आटोपून मुंबईकडे रवाना झाले.
मात्र, राज ठाकरे यांना नेमका कुणाचा फोन आला ज्यामुळे त्यांना नाशिकचा दौरा अर्धवट सोडावा लागला याविषयी सर्वांमध्ये चर्चेला उधाण आले. मात्र, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार त्यांना त्यांच्या काही खासगी कामानिमित्त तातडीने मुंबईला रवाना व्हावे लागल्याचे सांगण्यात आले.









