शरद पवारांचा कोणता शिलेदार लागला अजित पवारांच्या गळाला ?

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर हे उद्या औपचारिकरित्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे शरद पवार यांच्या गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक समर्थक देखील अजित पवार यांच्या गटात सामील होणार असून, येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदल महत्वाचा मानला जात आहे. यामुळे शरद पवार यांच्या गटाच्या स्थानिक राजकारणातली पकड कमजोर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुलाबराव देवकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात उमेदवारी केली होती. देवकर आणि पाटील यांच्यातील जुना संघर्ष सर्वश्रुत आहे. आता देवकर महायुतीत प्रवेश करत असल्याने, या संघर्षाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याच्या दृष्टीने हा प्रवेश निर्णायक ठरू शकतो. गुलाबराव देवकर यांचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरची पकड लक्षात घेता, महायुतीला त्यांचा प्रवेश मोठं बळ देऊ शकतो, तर शरद पवार गटाला आगामी निवडणुकांमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

या राजकीय हालचालींमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा गरम झालं आहे, आणि दोन्ही गुलाबरावांमधील संघर्ष कोणत्या टप्प्यावर पोहोचतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!