छगन भुजबळ आज घेणार मंत्रिपदाची शपथ

मुंबई | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उद्या मंत्र पदाची शपथ घेणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. मंगळवारी सकाळी हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर जानेवारी महिन्यात नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधी सोहळ्यात अजित पवार गटातून नाशिक मधून सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे त्याचप्रमाणे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले मात्र छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. भुजबळ समर्थकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळ यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांच्या दौऱ्यापासूनही ते अंतर राखून होते. त्यामुळे भुजबळांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

परंतु भुजबळांनी राष्ट्रवादीतच राहून आपलं काम सुरू ठेवलं. अलीकडच्या काळातच भाजप नेत्यांशी त्यांची जवळी देखील वाढली. भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटातून बाहेर पडणार का ? अशा देखील चर्चा मध्यंतरीच्या काळात सुरू होत्या परंतु, भुजबळ यांनी याकडे दुर्लक्ष करत आपलं काम सुरू ठेवलं. मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ही घेतली होती. अगदी दोन दिवसापूर्वीच भुजबळांनी फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली मात्र या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. परंतु आता याचा उलगडा होत आहे

मध्यंतरीच्या काळात सरपंच देशमुख हत्याप्रकरणी आरोप झालेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आता त्यांच्या जागी भुजबळ यांची वर्णी लागणार का याकडे देखील सर्वांच्या लक्ष लागून होतं. अखेर भुजबळ यांचा मंत्रिमंडळात प्रवेश निश्चित झाला असून मंगळवारी त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खातच दिलं जाऊ शकतं. कामात हातखंडा, प्रशासनावर पकड यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशान निश्चित जिल्ह्याला फायदा होणार आहे.

छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास
छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी आणि ज्येष्ठ नेते असून, त्यांनी अनेक मंत्रिपद भूषवले आहे. मागील काही काळापासून ते आघाडीतील घडामोडींमुळे आक्रमक भूमिकेत दिसत होते. त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. मात्र त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज होते.

मंत्रिपद मिळाल्याने काय बदल होणार?
भुजबळ यांना मंत्रिपद दिल्यास ओबीसी समाजात सकारात्मक संदेश जाण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाचे मोठे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश युतीसाठी हे फायदेशीर ठरू शकते.

पालकमंत्री पदासाठी स्पर्धा
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा सध्या वाद सुरू आहे. सध्या नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात समावेश होणार असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी भुजबळ यांचे नाव देखील स्पर्धेत येऊ शकते. भुजबळ हे राज्यातील एक ज्येष्ठ नेते असून नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत त्यामुळे संख्याबळाच्या दृष्टीने आणि जेष्ठत्वाच्या निकषानुसार राष्ट्रवादीने देखील नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे त्यामुळे आता भुजबळ यांचे नाव देखील पालकमंत्री पदासाठी पुढे येऊ शकते.

error: Content is protected !!