मुंबई । भारत हे आता जगातलं ‘क्रिएटर्स नेशन’ बनत असून येत्या दोन वर्षांत कंटेंट क्रिएशन इकोसिस्टमला चालना देण्यासाठी ८५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा यूट्यूब इंडियाचे CEO नील मोहन यांनी केली. जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन परिषद (WEAVES) मुंबईतील वर्ल्ड जिओ सेंटर येथे सुरू असून, तिच्या उद्घाटन सत्रात नील मोहन यांनी सहभाग घेतला.
नील मोहन म्हणाले, भारत हा यूट्यूबसाठी सर्वाधिक वेगाने वाढणारा देश आहे. येथे बनवलेल्या व्हिडिओ कंटेंटचा भारताबाहेरील वॉच टाईम तब्बल ४५ अब्ज तासांपर्यंत पोहोचला आहे. त्यांनी सांगितले की, जगभरातील नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यूट्यूब चॅनेल सर्वाधिक लोकप्रिय आहे, ज्याला २५ मिलियनहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.
गेल्या वर्षभरात भारतातून १० कोटी यूट्यूब चॅनेलवरून व्हिडिओ अपलोड करण्यात आले. यातील १५ हजार चॅनेल्सना १० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. यूट्यूबने गेल्या तीन वर्षांत भारतीय क्रिएटर्सना व मीडिया कंपन्यांना तब्बल २१ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मोहन पुढे म्हणाले की, यूट्यूब हे केवळ व्हिडिओ पाहण्याचे माध्यम राहिले नाही, तर ते आता सांस्कृतिक आदानप्रदानाचे एक जागतिक व्यासपीठ बनले आहे. भारतातील क्रिएटर्सना हे व्यासपीठ उद्योजक बनण्याची आणि जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करण्याची संधी देत आहे. ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ ही टॅगलाईन असलेल्या WEAVES परिषदेमुळे भारतात मीडियाचा, डिजिटल इनोव्हेशनचा आणि मनोरंजनाचा जागतिक केंद्रबिंदू निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. चार दिवस चालणार्या या परिषदेत जगभरातील क्रिएटर्स, स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्रातील नेते आणि धोरणकर्ते सहभागी होत आहेत.











