नाशिक । आगामी स्थानिक सवराज्य संस्थांच्या निवडणूकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. भाजपने ही निवडणूक महायुतीसोबतच लढण्याबाबत सुतोवाच केले असले तरी प्रसंगी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचेही संकेत दिले आहेत. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट महायुतीसोबत जाणार की, स्वबळावर याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांना विचारले असता त्यांनी याावर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
शिवसेना शिंदे गटात सध्या अंतर्गत गटबाजी चांगलीच उफाळून आली आहे. काही नाराज पदाधिकार्यांनी मुंबईत जात थेट शिवसेना नेते खा.श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत गटबाजी थोपविण्यासाठी शिंदे यांनी मुंबईत बैठक घेतली. तसेच आगामी निवडणूकांबाबत तयारीला लागण्याचे आदेश पदाधिकार्यांना दिले. महायुती झाली तर ठिक अन्यथा स्वबळावर लढण्याबाबतही याबैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
सोमवारी नाशिक दौर्यावर आलेल्या शिक्षणमंत्री दादा भुसे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवत असतो. महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवणार आहोत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. नाशिकमध्ये गटबाजी नाही. एक कुटुंब असल्याने मतप्रवाह असतात पण आम्ही एकोप्याने निर्णय घेतो. नाशिकमध्ये कोणतीही गटबाजी नाही. सर्वजण एकोप्याने निर्णय घेत असतो. चर्चा करत असतो. वरीष्ठ जे सांगतात ते काम करतो असे ते म्हणाले.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या हितासाठी
यंदाच्यावर्षीपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता येईल. संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. कोणालाही प्रवेश नाकारता येणार नाही. पारदर्शकतेसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.
बनावट तुकडी मान्यता
बनावट शासन आदेशानूसार तुकडयांना मान्यता देण्यात आली. यामाध्यमातून अनुदान लाटण्यात आले याबाबत विचारले असता ते म्हणाले, यासंदर्भात चौकशी प्रगतीपथावर आहे. दोन वर्षांपूर्वी अपेक्षित असलेल्या प्रक्रियेत झालेल्या विलंबाबाबत विचारले असता, मंत्री भुसे यांनी सांगितले, तांत्रिक कारणांमुळे ती थांबली होती. चौकशी सध्या प्रगतीपथावर आहे. नाशिक किंवा मालेगावपुरते हे मर्यादित नसून संपूर्ण विभागातील बाबी होत्या. चौकशीतून सत्य समोर येईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
ठाकरे गटाच्या टिकेवर प्रत्युत्तर
काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांना जाणीवपूर्वक धर्म विचारून हत्या केली. याला प्रतिक्रिया म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेृत्वाखाली पाकिस्तानला चांगला धडा शिकवला. अनेक अतिरेकी ठार मारले गेले. अनेक अतिरेक्यांचे अडडे उध्दवस्त झाले. आपल्या सैन्य दलाने किती मोठया प्रमाणात शौर्य गाजवले आहे. परंतू काही पक्ष याकडे राजकीय चष्म्यातून बघत आहेत. देशाच्या सैनिकांनी अतिशय संयमाने प्रभावी भूमिकापार पाडली. त्यामुळे कोणी उठसुठ राजकारण करू नये असा टोला त्यांनी लगावला.
पालकमंत्री नाही म्हणून कामे अडली नाही
पालकमंत्री पदाबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टपणे काहीही बोलणे टाळले. मात्र, विभागातील कामे निश्चित निकषांनुसार लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व सचिवांच्या माध्यमातून केली जातात, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री नसल्याने कोणतेही काम थांबले आहे का लोकप्रतिनिधी आपल्या कामााच्या याद्या जिल्हाधिकारी हे त्या समितीचे सचिव असतात त्यांच्याकडे देत असतात. निकषानूसार विकासकामे मार्गी लागत आहेत असे ते म्हणाले.









