पुणे – येत्या चार महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्य निवडणूक आयोगाने नव्या प्रभाग रचनेचे आदेश राज्य सरकारला दिले असून त्यानुसार निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात काल रात्री भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष पदाधिकार्यांची महत्त्वाची अनौपचारिक बैठक घेतली.
या बैठकीत पुणे शहर भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. फडणवीसांनी यावेळी पुणे महापालिकेतील भाजपच्या कामगिरीचा आणि आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे या चर्चेदरम्यान फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केलं की, पुण्याचा पुढचा महापौर हा भाजपचाच होणार, आणि 105 जागांवर भाजपचा दावा अबाधित राहील.
2017 साली पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 100 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेतील पाच नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे एकूण संख्या 105 वर पोहोचली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपने या जागांवर दावा ठोकत महायुतीतील चर्चेला एकप्रकारे दिशा दिली आहे.
फडणवीसांनी महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा प्रयत्न असल्याचं जरी सांगितलं असलं, तरी काही ठिकाणी अपवादात्मक भूमिका घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी सूचकपणे म्हटलं. अशा ठिकाणी अंतर्गत समजुतीनुसार निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पुणे हेच अपवादात्मक ठिकाण ठरणार का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
पुण्यात भाजपने 105 जागांवर दावा केल्यास महायुतीतील इतर घटकपक्ष – अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी शरद पवार गट नव्हे) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळणार, हेच महत्त्वाचं ठरणार आहे. जर हा फॉर्म्युला मान्य नसेल, तर पुण्यातील महायुतीमध्ये गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येत्या काळात महायुतीचा अंतिम फॉर्म्युला काय असेल, भाजपचा पुण्यातील दावा मान्य होईल की नाही, आणि अन्य पक्षांची भूमिका काय असेल, यावर पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकीचं राजकारण ठरणार आहे.








