नाशिक । नाशिक जिल्हा उध्दव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर हे पक्षात नाराज असून त्यांनी स्वतः याबाबत आपली कबुली दिली तसेच आपल्यासह १० ते १२ जण नाराज असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या नाराजीचे पडसाद आगामी काळात कसे उमटतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक दौर्यावर होते. राऊत यांची पत्रकार परिषद आटोपताच त्यांना दोन धक्के बसले. पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नला हजेरी लावली.
त्यातच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येत्या आठ दिवसांत मोठे राजकीय भूकंप होतील असे सूचक विधान केले तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे हे शिंदेंकडे येणार ना ! असे वक्तव्य केल्याने शिंदेंचे हे वक्तव्य चर्चेत आले.
दरम्यान, खासदार राऊत यांची पाठ वळताच आता शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. उबाठा गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी आपण पक्षात नाराज असून आपल्यासह १० ते १२ जण पक्षात नाराज असल्याचे सांगितले. विलास शिंदे हे देखील पक्षात नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. आपण काय भूमिका घेणार असे विचारले असता बघू येणार्या काळात ते समजेलच असे विधान केल्याने नाशकात शिवसेनेला येत्या काही दिवसांत मोठे खिंडार पडणार असे दिसतंय.
यावेळी बोलतांना बडगुजर म्हणाले, मी महापालिकेच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महापालिकेत ३६०९ पदं रिक्त आहेत. ४१०० कर्मचारी कार्यरत आहेत. कुंभमेळयाच्या अनुषंगाने ही रिक्त पदं भरावीत अशी आमची मागणी आहे ही मागणी मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
ते पुढे म्हणाले की, पक्षात नाराजी आहे हे खरं आहे. मी स्वतः देखील नाराज आहे. संघटनात्मक बदल करतांना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. लोकसभा निवडणूकीत आमच्यावर मोठे वार होत असतांनाही आम्ही राजाभाऊ वाजे यांना निवडून आणले. परंतू संघटनात्मक बदल करतांना विश्वासात घेतले गेले नाही.
यामुळे महानगरप्रमुख विलास शिंदे हे देखील काही दिवसांपासून नाराज आहे. नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. बघू आता पुढे काय होते ते अशा शब्दात बडगुजर यांनी सूचक इशारा दिला. त्यामुळे या लग्नसोहळयाच्या निमित्ताने नाशकात राजकीय भूकंप होणार हे निश्चित मानले जात आहे.





