नाशिक । आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून अद्याप निवडणूकी संदर्भात राज्य शासनाकडून कोणतेही संकेत मिळाले नसले तरी पक्षांतर्गत बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे दिसून येते. सध्या राज्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तर दूसरीकडे पवार काका पुतणे एकत्र येण्याबाबतही चर्चा झडू लागल्या आहेत. राजकीय भेटीगाठींचे सत्र वाढू लागल्याने आता पक्षीय घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. या पार्श्वभूमीवर १५ मे रोजी शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकार्यांना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे.
शिंदे गटात उफाळली गटाबाजी
शिवसेना शिंदे गटात अलीकडे गटबाजजी उफाळून आली आहे. पक्षाचे सचिव राम रेपाळे यांच्या सत्कार सोहळयाप्रसंगी पक्षाचे उपनेते विजय करंजकर, सह संपर्क प्रमुख राजू लवटे, महानगरप्रमुख प्रविण तिदमे यांच्यासह इतर पदाधिकार्यांची अनुपस्थितीवरून पक्षांत सारेकाही आलेबेल नाही याची प्रचिती आली. त्यामुळे या पदाधिकार्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे धाव घेतली. दरम्यान, सिध्देश कदम यांनाही नाशिकमध्ये लक्ष घालण्याचे सांगण्यात आले. पक्षाचे नेते शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा एकूणच पक्षावर वचक नसल्याचेच यावरून दिसून येते. दरम्यान, या एकूणच गटबाजीच्या पार्श्वभूमीवर आणि महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या सर्व अंगीकृत संघटनांना १५ मे रोजी पाचारण करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या जंजिरा या शासकीय निवासस्थानी ११ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत गटबाजीवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मनसे पदाधिकार्यांचीही बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १५ आणि १६ मे रोजी नाशिक दौरयावर येणार होते मात्र राज ठाकरे यांचा दौरा अचानक रदद करण्यात आला आहे. राज यांचा दौरा जरी रदद झाला असला तरी, पक्षाच्या पदाधिकारयांना मुुंबईत पाचारण करण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेही सक्रीय झाली असून या बैठकीत राज ठाकरे पदाधिकारयांना काय कानमंत्र देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.











