शिंदे गटात विसंवाद, नाराजांची शिंदेंकडे धाव

नाशिक । नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत गटबाजीने डोकं वर काढलं असून, पक्षात कुरबुरीचे वातावरण निर्माण झालं आहे. सोमवारी सायंकाळी शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीकडे काही पदाधिकार्‍यांनी पाठ फिरवली. यामुळे शिंदे गटात अंतर्गत गटातटाचे राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

उपनेते अजय बोरस्ते आणि काही जिल्हा प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. मात्र, शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, उपनेते विजय करंजकर आणि इतर काही महत्वाचे पदाधिकारी गैरहजर राहिले. यामुळे पक्षात नाराजीचं वातावरण असून, हे पदाधिकारी आज खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहेत.

राम रेपाळे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत गटातटाचे राजकारण नाही असा निर्वाळा दिला होता. मात्र, प्रत्यक्षात मात्र गटबाजीचं वास्तव समोर येत असल्याचं चित्र आहे. बैठकीच्या निमंत्रणावरूनही मतभेद उफाळले आहेत. महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी दूरध्वनीवरून प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आम्हाला बैठकीचं निमंत्रण मिळालंच नाही. त्याचवेळी उपनेते अजय बोरस्ते यांनी सर्वांना निमंत्रण दिलं होतं, एक-दोन पदाधिकारी काही वैयक्तिक कामामुळे गैरहजर राहिले, असं स्पष्ट केलं.

ही सगळी पार्श्वभूमी पाहता, नाराज पदाधिकार्‍यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी होणारी भेट महत्त्वाची ठरणार आहे. ते या गटबाजीवर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

error: Content is protected !!