बाळासाहेबांचे विचार आम्ही जपलेत ; महाजनांचे राऊतांवर टिकास्त्र

नाशिक – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. शनिवारी (ता. 17 मे) होणार्‍या पुस्तक प्रकाशनापूर्वीच या पुस्तकातील काही प्रकरणे चर्चेचा विषय बनली आहेत. विशेषतः ‘राजा का संदेश साफ है’ या प्रकरणात राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलेल्या मदतीबाबत दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या भूमिका मांडल्या आहेत. यावरून आता भाजपा नेते व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

महाजन म्हणाले की, संजय राऊत काय बोलतात, याकडे आता कोणी लक्षही देत नाही. ते फालतू बडबड करत असतात. मोदींनी राजीनामा द्यावा, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, असे राऊत युद्धाच्या काळात मागणी करत होते. सैन्याबद्दलही गैरवर्तन करत होते. अशा माणसाला गांभीर्याने घेण्याची गरजच नाही, अशी थेट टीका त्यांनी केली.

महाजन पुढे म्हणाले, आम्ही आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत आहोत. तेच विचार घेऊन चालणार्‍या खरी शिवसेनेसोबत आहोत. काँग्रेसच्या मांडीवर बसलेल्यांना बाळासाहेबांचे विचार कसे कळणार? त्यांची आजची परिस्थिती अशी आहे की त्यांना रोज सकाळी काहीतरी बडबड करावी लागते.

पुस्तकातील मजकूर वाचण्याबाबत विचारल्यावर महाजन म्हणाले, त्या पुस्तकात काय लिहिलंय, मी वाचलेलं नाही आणि वाचणारही नाही. त्या माणसाच्या लिखाणाला फार महत्त्व द्यावं का, यावरच शंका आहे, असं म्हणत त्यांनी राऊतांच्या लेखनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

राऊतांच्या पुस्तकातील भाजपविरोधी मजकुरामुळे खळबळ उडाली असतानाच गिरीश महाजन यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ही राजकीय लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आता पुस्तक प्रकाशनानंतर शिवसेना (ठाकरे गट) यावर काय प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!