मालेगाव । खरीप हंगाम सुरु होण्यापुर्वी शेतकर्यांच्या गरजा लक्षात घेवून त्यानुसार उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने खरीप हंगामात शेतकर्यांना खते व बियाणांची टंचाई भासणार यासाठी प्रभावी उपायोजना करावी. शेतकर्यांना खते आणि बियाणे वेळेवर व मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील यासाठी संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सुचना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी खरीप हंगामपुर्व आढावा बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिल्या.
तालुक्यातील काष्टी येथील शेतकरी भवन हॉल छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल येथे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत खरीप हंगामपुर्व नियोजन संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. भुसे म्हणाले की, मका पिकाच्या क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ होत आहे. परंतु मका पिकावर रोगांचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी. खरीप हंगामात शेतकर्यांना दर्जेदार व गुणवत्तापुर्ण बियाणे व खते उपलब्ध करुन देण्यासाठी कृषि विभागाने दक्ष राहून बियाणे व खते खरेदी करतांना घ्यावयाच्या काळजीबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करण्याच्या सुचना दिल्या. तसेच विविध कंपन्यांनी बियाणे व खतांची गुणवत्ता तपासण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. खरीप शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांपेक्षा सेंद्रीय व जैविक खतांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत नैसर्गिक आपत्ती, पंचनामे संदर्भात केलेली कार्यवाही व अनुदान वितरण, कृषि विज्ञानांतर्गत राबविलेल्या विविध मोहिमा, खरीप हंगाम नियोजन, पोकरा योजना सद्य:स्थिती, पिक विमा योजना सद्य:स्थिती, कृषि निविष्ठा- बियाणे व खतांची उपलब्धता, डाळींब इस्टेट सद्य:स्थिती, कृषि संकुलामार्फत उपलब्ध होणारे बियाणे, रोपे, जैविक खते,बिजोत्पादन, शेतीशाळा, विविध योजनांच्या फळबागा लागवड नियोजन आदी नियोजनबाबत व कृषि विभागामार्फत राबविण्यात येणार्या मोहिमा, उपलब्ध खतसाठा, मंजूर खत व मागणी, बियाणे मागणी, प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे तालुक्यातील लाभार्थी याबाबत सविस्तर माहिती संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी सादरीकरणाद्वारे उपस्थितांना दिली.
यावेळी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ई-पॉस मशिन वाटप, शेतकर्यांना कृषि विभागाच्या योजना व माहिती व्हावी यासाठी व्हॉट्सप चॅनलचे व कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती असलेले पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
या बैठकीला कृषी उपसंचालक एम. आर. वेठेकर, प्रकल्प उपसंचालक विलास सोनवणे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संजय शेवाळे, छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे सहायक अधिष्ठाता सचिन नांदगुडे, उप विभागीय कृषि अधिकारी संदीप मेढे, तालुका कृषि अधिकारी भगवान गोर्डे, गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे, नायब तहसिलदार रमेश खैरे यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पिक विमा प्रतिनिधी उपस्थित होते.











