नाशिक । शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये आयोजित शिबिरानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भाजपसह अजित पवार गटावर, तसेच पाकिस्तानच्या POK भूमिकेवर रोखठोक टीका केली. यावेळी बोलतांना त्यांनी आगामी निवडणुका, शरद पवारांची भूमिका, आणि विरोधी पक्षांच्या भेटीगाठी यांवर स्पष्ट भाष्य केले.
निवडणूकांची तयारी सुरू
नाशिकपासून धुळे, मालेगावपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या महापालिका निवडणुका ताकदीने लढवण्यात येणार आहेत, असे सांगत राऊत यांनी स्पष्ट केले की, सुप्रीम कोर्टाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार प्रत्येक पालिकेसाठी नियोजन व मार्गदर्शन सुरू आहे. नाशिकमधील शिबिर मोठ्या प्रमाणावर झाले असून अशाच प्रकारची शिबिरे इतर ठिकाणीही घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
शरद पवारांवर भाष्य
शरद पवार यांच्या एका मुलाखतीतील विधानावरून चर्चा सुरू असताना राऊत म्हणाले, एका ओळीवरून सुतावरून स्वर्ग गाठणं योग्य नाही. आम्ही त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलं आहे. त्यांनी ज्या धर्मांध आणि जातीयवादी शक्तींविरोधात लढा दिला, त्या शक्तींसोबत ते कधीच जाणार नाहीत.
सामंत खिचडी खायला गेले असतील
राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या अलीकडील भेटीवर भाष्य करत राऊत म्हणाले, लोकशाहीत कोणी कोणाकडे भेटायला जातं त्यावर बंदी नाही. शिवाजी पार्कला चांगली हॉटेलं आहेत, खिचडी चांगली मिळते, कदाचित त्याचसाठी गेले असतील. पुढे ते म्हणाले, या छुप्या भेटींमधून त्यांच्या पराभवाचे संकेत मिळत आहेत. एकीकडे तुम्ही भाजप- अजित पवारांसोबत आहात आणि दुसरीकडे इतर पक्षांसोबत संधान जुळवताय – मग नक्की कोणासोबत आहात? तुमच्या पक्षाची नवी निशाणी आता ‘खिचडी’ ठेवा, असा टोला राऊतांनी लगावला.
POK वरून केंद्र सरकारवर टीका
पाकिस्तानने POK सोडावा या मागणीवरून केंद्र सरकारवर घणाघात करत राऊत म्हणाले, उद्या जर ते POK सोडणार असतील तर युद्ध का पुकारलं? आमच्या सैन्याला चार दिवस मिळाले असते तर POK काय, लाहोर-कराचीवरही झेंडा फडकावला असता. पण सरकारने ट्रम्पच्या दबावापुढे कच खाल्ली. POK मागत असताना ट्रम्पला विचारलं होतं का? असं विचारत राऊतांनी ट्रम्पवरील अवलंबित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं. आता पुढचं ट्विट ट्रम्प काय करतो हे बघावं लागेल, असं ते उपरोधाने म्हणाले.
भाजपची तिरंगा यात्रा म्हणजे ढोंग
भाजपच्या तिरंगा यात्रेवरही राऊतांनी कठोर शब्दांत टीका केली. तिरंगा हातात घेऊन यात्रा काढता, पण ट्रम्पसमोर शरणागती पत्करता. यापुढे भाजपला गावागावात ‘डोनाल्ड जत्रा’ भरवावी लागेल, असा उपरोधिक हल्ला राऊतांनी चढवला. भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगावं लागेल – ‘डोनाल्ड जत्रेला जाऊन येतो!’
गद्दारांवर कारवाईचा इशारा
ठाकरे गटाच्या बॅनरवरून सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर बोलताना राऊत म्हणाले, गद्दारांचा समाचार आम्ही घेणारच. त्यांची काय ताकद आहे, हे त्यांनी ट्रम्प आणि इतर पुढार्यांसमोर झुकून दाखवलंय असे ते म्हणाले.










