नाशिक । उबाठाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत, भाजपातून बाहेर गेलेले अनेकांनी मुख्यमंत्रयांची भेट घेतली. त्यामुळे जिल्हयाचे राजकारण कोणत्या दिशेला चालले आहे असे विचारले असता जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, जिल्हयातील अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहे. येत्या आठ दिवसांत कोण कुठे जातंय आणि कोण कुणाच्या सोबत आहे हे स्पष्ट होईल असा सूचक इशारा देतांनाच महाजन यांनी जिल्हयात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे जणू संकेतच दिले.
आज नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दत्तक नाशिकचे अनाथालय झाले, असा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. मात्र, याच टीकेला उत्तर देताना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कोण अनाथ झाले, हे निवडणुकीनंतर समजेल, असा जोरदार प्रतिहल्ला केला.
महाजन म्हणाले, संजय राऊत यांच्यावर बोलण्यासारखे काही नाही. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याइतकेही ते माणूस राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बडबडीला फारशी प्रसिद्धी देण्याची गरज नाही. त्यांच्या बडबडीमुळे पक्षात गोंधळ माजला असून खुद्द उद्धव ठाकरेही कदाचित त्रस्त असतील.
निकाल लागल्यावर भेटू
दत्तक नाशिकबाबत राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना महाजन म्हणाले, तुम्ही किती विकास केला, तुमची बडबड किती लोकांना पटते हे निवडणुकीत स्पष्ट होईल. निवडणूक सामोरी या. निकाल लागल्यानंतर आपण नक्की भेटू. तेव्हाच समजेल, कोण अनाथ झालं.
ठाकरे गट नेस्तनाभूत होईल
ठाकरे गट नेस्तनाभूत होण्याच्या वाटेवर असल्याचा दावा करत महाजन म्हणाले, पक्षात आता कुणाचा ताबा राहिलेला नाही. राऊतांची बडबड हीच पक्षाच्या अधःपतनाचं कारण बनली आहे. त्यांच्या बडबडीला सगळेच जण कंटाळले आहेत परंतू आता संगळेच कंट्रोलच्या बाहेर गेले असल्याने उबाठा नेतस्तनाभूत करायला राउत पूरेसे आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला.






