मुंबई । नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला केवळ 20 जागा मिळाल्या, तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळवता आली नाही. या धक्कादायक निकालांनंतर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेलं वक्तव्य लक्षवेधी ठरत आहे.
राऊत म्हणाले, पडद्यामागे पटकथा लिहिली जातेय, आणि ही पटकथा लिहिली जाणार आहे. सगळं सुरळीत सुरु आहे. आम्ही सकारात्मक आहोत. या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनाला राजकीय बळ मिळण्याची शक्यता आहे.
‘नरकातला स्वर्ग’मधून उलगडलेले राजकीय गुंते
तुरुंगवासाच्या काळातील अनुभवांवर आधारित ’नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात संजय राऊत यांनी अनेक खळबळजनक गोष्टी उजेडात आणल्या आहेत. मी लिहिलेलं सर्व 100 टक्के सत्य आहे, असं स्पष्ट करताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शिवसेनेनं दिलेल्या मदतीचंही उल्लेख केला. 35 मिनिटांची चर्चा होती, पण बाळासाहेब ठाकरे यांची ती चर्चा मी टाकलेली नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
राज ठाकरे यांनी फोन करायला हवा होता
तुरुंगवासाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांनी त्या कठीण काळात फोन करायला हवा होता. अशावेळी थोडा आधार मिळतो. आमच्यावर संकटाचा डोंगर कोसळला होता. या वक्तव्यामुळे ठाकरे कुटुंबातील भावनिक ताणतणाव पुन्हा समोर आला आहे.
सरकार पाडा, नाहीतर तुरुंगात जा! – भाजपचा दबाव
महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या प्रयत्नांदरम्यान भाजपकडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. दिल्लीतील एका जेष्ठ नेत्याने मला सांगितलं – सरकार पाडा, नाहीतर तुरुंगात जा. मी त्यानंतर व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिलं, असंही त्यांनी सांगितलं.









