युद्ध थांबले: भारताने आपल्या अटींवर केला युद्धविराम

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या तणावपूर्ण भारत-पाकिस्तान संघर्षावर अखेर पडदा पडला आहे. भारताने आपल्या स्पष्ट अटींवर युद्धविराम करण्याचा निर्णय घेतला असून, याला पाकिस्ताननेही सहमती दर्शविली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या ऐतिहासिक निर्णयामागे आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलं की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घ चर्चेनंतर तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती झाली आहे. दोन्ही देशांनी दाखवलेल्या संयमाचे कौतुक आहे. ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी महत्त्वपूर्ण वाटाघाटी झाल्या होत्या.

पाकिस्तानची प्रतिक्रिया: शांतीसाठी कटिबद्ध
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनीही युद्धविरामावर सहमती दर्शवत म्हटले की, पाकिस्तानने नेहमीच शांततेसाठी प्रयत्न केले आहेत, आमचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता. त्यांच्या प्रतिक्रियेतून पाकिस्तानकडूनही काही प्रमाणात मवाळ भूमिका घेतली गेल्याचे संकेत मिळत आहेत.

भारताची स्पष्ट भूमिका: दहशतवाद सहन नाही
भारताकडून मात्र स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, पुढील काळात कुठलाही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध पुकारलेलं युद्ध समजलं जाईल आणि त्याला तात्काळ उत्तर दिलं जाईल. ही भूमिका भारताने अधिकृतरित्या घेतली असून, यामध्ये कोणतीही गोंधळाची शक्यता नाही.

पहलगाम हल्ला: निर्णयामागील पार्श्वभूमी
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या अमानुष घटनेनंतर भारत सरकारने तात्काळ कठोर कारवाईचा निर्णय घेतला.
7 मे रोजी रात्री भारताने पाकिस्तानातील आणि पाक-व्याप्त काश्मिरातील 9 दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक करत महत्त्वाचे अड्डे उद्ध्वस्त केले. ह्या कारवाईने भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, दहशतवाद्यांविरुद्ध शून्य सहनशीलतेचीच भूमिका स्वीकारली जाईल.

युद्ध थांबले, पण सजगतेचा इशारा कायम
युद्ध थांबले असले तरी परिस्थिती पूर्णपणे निवळली आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. भारताने शांततेची संधी दिली आहे, पण भविष्यात कुठलीही कारवाई किंवा हल्ला झाला तर त्याला प्रतिउत्तर देण्यास भारत सक्षम असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

error: Content is protected !!