आता केवळ उत्तर नव्हे, नाश! भारत DEAD धोरणावर

नवी दिल्ली । पाकिस्तानकडून भारतावर करण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारतीय सैन्याने आता जोरदार आणि निर्णायक उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भारताने केवळ संरक्षणात्मक धोरणावर न राहता, पाकिस्तानच्या लष्करी तळांवर थेट प्रहार करत प्रतिहल्ल्यांची मालिका उघडली आहे. परिणामी, पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले असून, त्यांच्या गोटात चिंता वाढली आहे.

भारताने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर आता तिसर्‍या टप्प्यात प्रवेश करत आहे. सुरुवातीला फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणार्‍या कारवायांची मर्यादा आता पाकिस्तानच्या लष्करी संरचना आणि हवाई तळांपर्यंत पोहोचली आहे. भारतीय सैन्याने ‘Suppression of Enemy Air Defence (SEAD)’ ची रणनीती पार करून आता ‘Destruction of Enemy Air Defence (DEAD)’ धोरण अंगीकारले आहे.यामुळे पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाला जबर झटका बसला आहे. भारताच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानला संरक्षणात्मक भूमिकेवर यावे लागत आहे.

प्रतिहल्ल्यांचे टप्पे:
पहिला टप्पा: पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला.
दुसरा टप्पा: ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र तळांवर सर्जिकल स्ट्राईक.
तिसरा टप्पा: DEAD धोरणानुसार, पाकिस्तानचे हवाई रडार तळ, एअर डिफेन्स युनिट्स उद्ध्वस्त.

इशाक दार यांची नरम भूमिका
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी आश्चर्यजनक नरमाईची भूमिका घेतली आहे. आम्हाला युद्ध नको. जर भारत थांबला, तर आम्हीही थांबू. आम्हाला निधीचा अपव्यय नको, आम्हाला शांतता हवी, असे वक्तव्य त्यांनी केले. अलीकडेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इशाक दार यांनी आक्रमक विधान करून वातावरण तापवले होते. मात्र भारताच्या तडाखेबंद कारवायांनंतर त्यांची भूमिका लक्षणीय बदललेली दिसून येते.

भारताच्या तयारीचा इशारा
संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून पुन्हा एखादा हल्ला झाला, तर ऑपरेशन सिंदूर ३ अंतर्गत आणखी व्यापक आणि ठोस कारवाई केली जाणार आहे. यामध्ये पाकिस्तानच्या मुख्य लष्करी तळांवर तसेच साठवणूक केंद्रांवर लक्ष्य ठेवले जाणार असल्याचे संकेत आहेत.

error: Content is protected !!