नाशिक । शहरात शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक विविध चौकात सायरनचा आवाज घुमल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही क्षणातच सोशल मीडियावर सायरन का वाजतोय? अशा पोस्टचा वर्षाव सुरू झाला आणि नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले.
भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्व जिल्हयांना अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरापासून नाशिकमध्येही नागरी संरक्षण दलाकडून विविध ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येत आहे. याव्दारे नागरीकांना युध्दजन्य परिस्थिती दरम्यान काय काळजी घ्यावी याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच केंद्रिय गृहमंत्रालयाच्या निर्देशानूसार सायरन वाजवून धोक्याचा अलर्ट देण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान शनिवारी दुपारच सुमारास अचानक शहरातील सायरन वाजण्यास सुरूवात झाली अन बघता बघता नागरीकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सोशल मिडीयावर यासंदर्भात पोस्ट व्हायरल झाल्या. अनेकांनी ही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तातडीची सूचना समजून त्वरित सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी लोकांनी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून सुरक्षिततेची खात्री करून घेतली.याबाबत योग्य ती पूर्वसूचना न दिल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्वरीत स्पष्टीकरण देण्यात आले.सदरचे सायरन हे नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचे असून या सायरनची तपासणी करण्यात येत असल्याचा खुलासा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आला आहे. स्माट्र सिटीने शहरात २०० सायरन बसवले असून त्याची ही तपासणी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाउ नये ही एक सुरक्षा तपासणी असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.








