नाशिक – ‘खालिद का शिवाजी’ या आगामी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे विकृत आणि अपमानजनक चित्रण केल्याच्या आरोपांवरून राज्यात वादाची लाट उसळली आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी या चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी करत नालायक बोडक्याच्या दिग्दर्शकांनी खबरदार व्हा, अन्यथा घरात घुसून मारू, असा इशाराच दिला आहे.
अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे नरेंद्र पाटील यांनी ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाविषयी संतप्त भावना व्यक्त केली आहे. नाशिक येथे बोलताना पाटील म्हणाले, आमच्या छत्रपती शिवरायांबद्दल चुकीचे दाखवू नका. इतिहास विकृत केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. सरकारने त्वरित कारवाई करून चित्रपटावर संपूर्ण बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, शिवराय कधीही मुघल विचारांसमोर झुकले नाहीत. या चित्रपटाने इतिहास विकृत करून समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवरायांचे अंगरक्षक मुस्लिम होते, हे विधान पूर्णपणे खोटे असून इतिहासकारांनीही ते फेटाळले आहे. शिवरायांचे मावळे सर्व जातीधर्मातून होते – बारा बलुतेदार, अठरा पगड जातींचे होते.
पाटील यांनी स्पष्टपणे म्हटले की, चित्रपटातून जर अशा प्रकारे समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही मावळे शांत बसणार नाही. आम्ही सरकारला वेळ देत आहोत. नाहीतर रस्त्यावर उतरून हे थांबवू. असा इशाराच त्यांनी दिला आहे. चित्रपटाच्या लेखकाला इतिहासकारांसमोर बसवा. चुकीचे दाखवले तर ते बदला, अन्यथा आम्ही घरात घुसून मारायला तयार आहोत. गुन्हे दाखल झाले तरी चालतील, असेही ते म्हणाले. जर सरकारने वेळकाढूपणा केला, तर मराठा संघटना एकवटतील, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.











