मुंबई । ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने एक महिन्यासाठी स्थगिती दिली आहे. ही कारवाई महाराष्ट्र सरकारने चित्रपटातील ऐतिहासिक चुकीबाबत आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर संभाव्य परिणामाबाबत व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून त्यातील काही संवादांवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. काही संघटनांनी प्रदर्शनावर प्रत्यक्ष बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे प्रकरण अधिक संवेदनशील झाले. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याबाबत पत्र लिहिलं. त्यानंतर दिग्दर्शक राज मोरे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतरच ही स्थगिती जाहीर झाली.
पुन्हा एकदा परीक्षण होणार
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून चित्रपटाचे पुन्हा एकदा परीक्षण करण्यात येणार आहे. चित्रपट प्रमाणन अधिनियम, 1952 च्या कलम 6(2) अंतर्गत एक महिन्यासाठी प्रमाणपत्र स्थगित करण्यात आलं आहे. या कालावधीतच चित्रपटाचे परीक्षण पूर्ण करून अंतिम निर्णय घेतला जाईल.
सणांची पार्श्वभूमी
दहीहंडी आणि गणेशोत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर समाजात तणाव निर्माण होऊ नये म्हणूनच सरकारने पुढाकार घेतला आहे.
आशिष शेलार यांचे ट्विट
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे सांगितले की, चित्रपटातील ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास आणि सांस्कृतिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, म्हणूनच हे प्रदर्शन तात्पुरते थांबवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे
हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी महाराष्ट्र शासनाच्याच सांस्कृतिक कार्य विभागाने पाठवला होता.










