वाघा बॉर्डर बंद केल्याने किती होईल नुकसान ?

विशेष प्रतिनिधी । पहलगाम (जम्मू-कश्मीर) येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी कडव्या उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमध्ये वाघा-अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानच्या नागरिकांसाठी व्हिसा रद्द करणे आणि इतर महत्त्वपूर्ण करार निलंबित करणे यांचा समावेश आहे. भारताने पाकिस्तानबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेच दोन्ही देशांवर काय परिणाम होतील हे जाणून घेवूया…

आर्थिक परिणाम
भारतातील पंजाबमधील अमृतरपासून २८ किलोमीटर तर पाकिस्तानातील लाहोरपासून २४ किलोमीटर अंतरावर असलेली अटारी वाघा बॉर्डर ही दोन्ही देशांमधील व्यापारासाठी एकमेव भूमार्ग आहे. भारतीय भू-बंदर प्राधिकरणाच्या अहवालानूसार या सीमेवरून २०२३:२०२४ मध्ये ३८८६.५३ कोटी रूपयांचा व्यापार झाला. चालू आर्थिक वर्षात एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत पाकिस्तानसोबत व्यापार बंदी असूनही भारताने ३७२० कोटी रूपयांची निर्यात केली. यामध्ये औषधांचा कच्चा माल, साखर, ऑटो पार्टस, खते यांचा सामावेश आहे. मात्र भारताची पाकिस्तानमधून होणारी आयात कमी होती. ती फक्त ३.५ कोटी रूपये इतकी होती.

भारतीय भू-बंदर प्राधिकरणाच्या अहवालानूसार या सीमेवरून होणार्‍या व्यापारावर जरनजर टाकली तर २०१८ :२०१९ मध्ये ४३७० कोटी रूपयांचा व्यापार झाला.२०२२ :२०२३ मध्ये २२५७ कोटी रूपये व्यापार झाला. यात घसरण दिसून येते. तर २०२३ :२०२४ मध्ये यात वाढ होवून ३८८६ कोटी रूपयांचा व्यापार झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे, भारताच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. यामुळे इंधन खर्च वाढेल आणि प्रवासाचा कालावधी वाढेल. वाघा-अटारी सीमा बंद झाल्यामुळे सीमावर्ती भागांतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. व्यापार, नोकरी आणि सामाजिक संबंधांवर याचा प्रतिकूल परिणाम होईल. वाघा सीमावरील ‘बीटिंग रिट्रीट’ समारंभ, जो दोन्ही देशांतील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू होता, सध्या स्थगित करण्यात आला आहे.

भारतातून पाकिस्तानात काय जाते?
भारतातून पाकिस्तानात खाद्य पदार्थांची निर्यात केली जाते. बटाटे, कांदे, लसूण यांचा यात सामावेश आहे. तसेच डाळ, हरभरा, बासमती तांदूळ, कापूस, पाठवला जातो. तसेच विविध प्रकारची फळे, भाजीपाला अशा अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची भारतातून पाकिस्तानात निर्यात होते. विशेष म्हणजे आसाम, दार्जिलिंगमधून सुगंधित चहाची पानेही पाकिस्तानात पाठवली जातात. तसेच सेंद्रिय रसायने, औषधे, साखर यांचीही निर्यात होते. त्यामुळे भारतापेक्षा पाकिस्तानलाचा याचा सर्वाधिक फटका बसू शकतो.

पाकिस्तानातून काय येते ?
पाकिस्तानातून भारतात पेशावरी चप्पल, लाहोरी कुर्ते, मुलतानी माती, कापूस, चामडे, काही वैद्यकिय उपकरणांचाही सामावेश आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानसोबतचा व्यापार पूर्णपणे थांबवण्याचा विचार करत आहे. या दंडात्मक कारवाईमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या निर्णयाचे भारतापेक्षा पाकिस्तानवर गंभीर परिणाम होतील. यामुळे पाकिस्तानला काही महत्वांच्या उत्पादनांच्या पुरवठयावर परिणाम होईल आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसेल. पाकिस्तान आधीच आर्थिक संकटात असतांना या हल्ल्यामुळे देशाचा शेअर बाजार आणखी कोसळला आहे.

सुकामेवा महागणार ?
अफगाणिस्तानातून भारतात सुका मेव्याची आयात होते. यात बदाम, अंजीर, खजुर, मनुका आणि इतर सुकामेवा अफगाणहून भारतात वाघा बॉर्डरमार्गे येतो परंतू आता त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताना आता इराण, सौदी अरेबियातून आयात वाढवावी लागेल. मात्र अफगाणवरून हवाईमार्गे देखील सुका मेव्याची आयात भारत करू शकतो.

राजकीय परिणाम
भारताने पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकार्‍यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत, तर पाकिस्तानेही भारतीय अधिकार्‍यांना देश सोडण्यास सांगितले आहे. या कृतींमुळे दोन्ही देशांतील राजनैतिक तणाव वाढला आहे.

पाण्याच्या करारावर परिणाम: भारताने सिंधू जल करार निलंबित केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये जलसंपत्तीच्या बाबतीत चिंता वाढली आहे.

error: Content is protected !!