जुनी पीक विमा योजना लागू, किती भरावा लागेल हप्ता

परभणी – राज्यातील शेतकर्‍यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून राज्यात जुनी पीक विमा योजना पुन्हा एकदा लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पार पडलेल्या ५३व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

या नव्या निर्णयानुसार शेतकर्‍यांना केवळ २ टक्के प्रीमियम भरून पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. गेल्या काही वर्षांत पीक विमा योजनेवर सातत्याने टीका झाली होती. शेतकर्‍यांना योग्य प्रमाणात नुकसानभरपाई मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर जुनी योजना पुन्हा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

कृषीमंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले की, पीक विमा योजनेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. यासाठी एक स्पष्ट आणि पारदर्शक धोरण तयार करण्यात येईल.

पेरणीची घाई नको
मे महिन्यातच झालेल्या अनपेक्षित पावसामुळे काही भागांत शेतीसाठी हालचाल सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, शेतकर्‍यांनी पेरणीसाठी अजून थांबावे, असा सल्ला कोकाटे यांनी दिला आहे. शेतकर्‍यांनी आयएमडी (हवामान विभाग) आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची वाट पहावी. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्यवेळी पेरणी करावी, अन्यथा नुकसान होऊ शकते, असे ते म्हणाले.

रेकॉर्डब्रेक पावसामुळे धोरणात्मक मदत
या वर्षी मे महिन्यातच विक्रमी पावसाची नोंद झाल्यामुळे अनेक भागांत शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार धोरणात्मक पातळीवर विचार करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी उपाययोजना करणार आहे, असे आश्वासन कोकाटे यांनी दिले.

error: Content is protected !!