गृहकर्ज महागले, नव्या कर्जदारांच्या EMI मध्ये वाढ

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडील पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट ५.५ टक्क्यांवर स्थिर ठेवला असला तरी, त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकेनुसार, नव्या कर्जदारांसाठी गृहकर्जाचा व्याजदर २५ बेसिस पॉईंट्सनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वी ७.५० टक्के ते ८.४५ टक्क्यांच्या दराने दिले जाणारे कर्ज आता ७.५० टक्के ते ८.७० टक्क्यांपर्यंत दिले जाईल. हा बदल १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे.

कर्जदारांवर परिणाम
ज्या ग्राहकांनी उच्च व्याजदराचा पर्याय निवडला आहे त्यांना दरमहा अधिक EMI भरावा लागेल. उदाहरणार्थ, ३० लाख रुपये कर्ज २० वर्षांच्या कालावधीसाठी घेतले असल्यास, पूर्वी २५,८३० रुपयांचा हप्ता लागू होत होता. नव्या दरांनुसार हा हप्ता वाढून २६,२७८ रुपये होईल. म्हणजेच, दरमहा सुमारे ४५० रुपये अधिक, तर कर्जाच्या कालावधीभरात जवळपास १ लाख रुपये जास्त भरावे लागतील.

इतर बँकांची स्थिती
यूनियन बँक ऑफ इंडियाने व्याजदर ७.३५ टक्क्यांवरून ७.४५ टक्क्यांवर नेला आहे.
एचडीएफसी बँक सध्या ७.९० टक्के,
आयसीआयसीआय बँक ८ टक्के
अ‍ॅक्सिस बँक ८.३५ टक्के व्याजदर आकारत आहे.

गृहकर्ज वितरणात वाढ
पहिल्या तिमाहीत एचडीएफसीच्या गृहकर्ज वितरणात ७ टक्क्यांनी वाढ झाली. आयसीआयसीआयमध्ये ही वाढ १०.३० टक्के, एसबीआयच्या पोर्टफोलिओमध्ये १४ टक्के, तर बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल १८ टक्के वाढ नोंदली गेली.

error: Content is protected !!