कर्जमाफीचे काय झाले… भर सभेत शेतकर्‍यांचा कृषीमंत्र्यांना सवाल

नाशिक । नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मोठ्या गदारोळात ‘कर्जसामोपचार परतफेड योजना’ (ओटीएस) मंजूर करण्यात आली. कृषीमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शेतकर्‍यांनी व्याजमाफीसाठी जोरदार मागणी केली, मात्र ती डावलून ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान कर्जमाफीवरून शेतकरी प्रतिनिधींनी थेट कृषीमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनाच जाब विचारल्याने कोकाटे मात्र या प्रश्नावर निरूत्तर झाले.

राज्याचे कृषी मंत्री अ‍ॅड.कोकाटे व जिल्हा बँकेचे संस्थात्मक सल्लागार विद्याधर अनास्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (ता.४) जिल्हा बँकेची विशेष सर्वसाधारण सभा महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडली. जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी व्यासपीठावर विभागीय सहनिबंधक संभाजी कदम, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक ए. के. पाटील उपस्थित होते.

यावेळी जिल्हा बँकेला उर्जितावस्था आणण्यासाठी नवीन ओटीएस योजना मांडण्यात आली. या नव्या योजनेनुसार, थकीत कर्जदारांना मूळ कर्जासह २ ते ६ टक्के दराने व्याज भरावे लागणार आहे. परतफेडीची व्यवस्था तीन टप्प्यांत करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत १० टक्के रक्कम, त्यानंतर महिन्याभरात १५ टक्के, आणि ३१ मार्च २०२६ पूर्वी उर्वरित ७५ टक्के रक्कम भरण्याची संधी कर्जदारांना मिळणार आहे.

कर्ज आणि व्याजावरून रोष
सभेच्या सुरुवातीलाच तालुका प्रतिनिधी निवडीवरून गोंधळ उडाला. त्यातच कर्जदार शेतकर्‍यांनी व्याजमाफीबाबत आक्रमक भूमिका घेतली. दिंडोरीचे प्रकाश शिंदे यांनी किमान व्याज माफ करावे, अशी मागणी करत व्यासपीठासमोर इतर शेतकर्‍यांसह गर्दी केली. यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. कोकाटे यांच्यावर जुन्या विधानांचा संदर्भ देत शेतकर्‍यांनी टीका केली.

सभेत माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी बँकेतील कर्मचार्‍यांवर गंभीर आरोप करत म्हटले की, नोटबंदी काळात टक्केवारीवर नोटा बदलून देण्यात आल्या. यामुळे बँक अडचणीत आली आहे. त्यांनी मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली आणि दोषी कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी केली.

मंत्र्यांची भूमिका आणि बँकेची स्थिती
कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकर्‍यांचा विरोध लक्षात घेत शांतता राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “बँक वाचवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. सरकार शेतकर्‍यांच्या बाजूने आहे आणि अडचणी दूर करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.” बँकेचे सल्लागार विद्याधर अनास्कर यांनी बँकेची परवाना रद्द होण्याची शक्यता असल्याचे सांगत, ही योजना अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले.

मग मी काय करू ?
सभेप्रसंगी शेतकर्‍यांनी कृषीमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांना कर्जमाफीचे काय झाले असा सवाल केला. निवडणूक काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आपणही कर्जमाफी देवू असे आश्वासन दिले. नाशिक जिल्हयात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून दिले. मंत्री दिले. मग आता कर्जमाफीचे काय झाले असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी कोकाटे यांनी आश्वासन दिले होते असे सांगत नाही झाले काय करू असे उत्तर देत हतबलता व्यक्त केली.

अशी आहे योजना
१ लाखपर्यंत थकीत कर्जदार – २% व्याज
५ लाखपर्यंत – ४%
१० लाखपर्यंत – ५%
१० लाखांहून अधिक – ६%

error: Content is protected !!