श्रीखंडासाठी ८ रूपये अधिकचे घेणे पडले १५ हजारांत

धुळे – श्रीखंड खरेदी करताना ग्राहकाकडून आठ रुपये अधिक घेणे एका दुकानदाराला चांगलेच महागात पडले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने या प्रकरणात दुकानदारावर दंड ठोठावताना एकूण १५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

ही घटना दिघावे (ता. साक्री, जि. धुळे) येथे घडली. कैलास भदाणे या ग्राहकाने आशापुरी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कोल्ड्रिंक्स या दुकानातून अमूल कंपनीचे २० ग्रॅम वजनाचे श्रीखंड खरेदी केले. संबंधित उत्पादनावर छापिल किमत ५२ रुपये असताना दुकानदार हेमंत भामरे यांनी भदाणे यांच्याकडून ६० रुपये आकारले. जेव्हा भदाणे यांनी ही वाढीव रक्कम विचारली, तेव्हा दुकानदाराने “कूलिंग चार्जेस” या कारणाखाली अधिक पैसे घेतल्याचे सांगितले. यानंतरही भदाणे यांनी पक्की पावती मागितली असता, तीदेखील देण्यात आली नाही.

भदाणे यांनी ही बाब भाजप ग्राहक संरक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव यांच्या निदर्शनास आणून दिली. अ‍ॅड. येशीराव यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधित दुकानदाराविरुद्ध ग्राहक तक्रार दाखल करण्यात आली. दुकानमालक भामरे यांनी नोटिशीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ही तक्रार थेट ग्राहक आयोगाकडे नेण्यात आली.

२९ एप्रिल २०२५ रोजी या प्रकरणाचा निकाल देताना आयोगाच्या अध्यक्षा निता देसाई आणि सदस्या अ‍ॅड. रसिका निकुंभ यांनी दुकानदाराने ग्राहकाकडून घेतलेले आठ रुपये आठ टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले. याशिवाय मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी १० हजार रुपये व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी ५ हजार रुपये अशा एकूण १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई भदाणे यांना देण्याचा आदेश दिला आहे.

या प्रकरणामुळे निश्चित दरापेक्षा अधिक किंमत आकारणार्‍या व्यावसायिकांविरुद्ध कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे. अ‍ॅड. येशीराव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन सादर करून अशा अनुचित व्यावसायिक प्रथांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

error: Content is protected !!