मुंबई : अतिवृष्टीने राज्यात सध्या अस्मानी संकट उभे राहिले आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात तर पावसानं हाहाकार माजवला. अतिवृष्टीने राज्यात 60 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे . पावसाच्या परतीची वाट आता जनता पाहत आहेत. अशातच आता मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
२९ सप्टेंबर पासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
७ ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि सुमारे ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.







