नाशिकमध्ये पहाटे पावसाचा शिडकावा ; पुढील तीन दिवस कसे असेल हवामान

नाशिक । तापमानाचा पारा ४० अंशावर पोहचला असतांना हवामानात पुन्हा एकदा बदल होतांना दिसत आहे. आज पहाटेच्या सुमारास नाशिक शहराच्या अनेक भागात विजांचा कडकडाट झाला तर काही भागात पावसाचा हलकासा शिडकावा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात अवकाळीचे संकट घोंगावतांना दिसून येत आहे.


राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. काही शहरात तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे. अशी परिस्थिती असताना अवकाळी पावसाच्या संकटाचाही इशारा मिळाला आहे. पुढील तीन दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भासह अन्य ठिकाणी पाऊस होईल अशी शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये देखील दोन दिवसांपासू अधूमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.


आज पहाटे राज्यात अनेक ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. रायगड, पनवेल, यवतमाळ या ठिकाणी पाउस झाला. राज्यात अनेक ठिकाणी सकाळपासून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे दिवसभरात पावसाची शक्यता दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार, देशाच्या पर्वतीय भागांमधील हवामानात अनेक बदल झाले असतांना दक्षिण भारताकडून वाहणार्‍या वार्‍यांमुळे राज्यातील हवामानावर परिणाम होतांना दिसत आहे.

उत्तर पश्चिम भारतामध्ये उष्णतेची लाटेची परिस्थिती असेल, तर पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर काही राज्यांमध्ये वादळी वारेसुध्दा वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. येत्या ४८ तासांमध्ये हवामानात मोठे बदल होणार असून, पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे.

पुढील ३ दिवस राज्यातील काही जिल्हयांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. एप्रिल महिन्यात नाशिक जिल्हयातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे ४ हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले. आता पुन्हा एकदा अवकाळीचे संकट घोंगावत असल्याचे बळीराजा चिंतेत सापडला आहे.

error: Content is protected !!