जून महिन्यात कसा असेल पावसाचा अंदाज

नवी दिल्ली । भारतीय हवामान विभागाने (IMD) आगामी जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशभरात पडणारा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या १०८ टक्के पर्यंत जाऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. यामुळे शेतीसाठी अनुकूल हवामान राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि इतर मध्य व दक्षिण भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. मात्र, ईशान्य भारतात यंदा सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तर वायव्य भारतात सरासरीएवढा पाऊस अपेक्षित आहे. ऐन मे महिन्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी २९ मे पासून ५ जूनपर्यंत पाऊस पडणार नाही. यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

‘भारत फोरकास्ट सिस्टीम’चा शुभारंभ
भारत सरकारने आज ‘प्रगत भारत फोरकास्ट सिस्टीम’ (BFS) सुरू केली आहे. ही प्रणाली देशातील हवामान अंदाज प्रणालीत क्रांतिकारक बदल घडवेल, असा विश्वास केंद्रीय विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

BFS चे वैशिष्ट्ये:
IIMT पुणे यांनी ही प्रणाली विकसित केली आहे.
हवामान अंदाज आता ६ किमी रिझोल्यूशनवर दिला जाईल
हे जगातील सर्वोत्तम मोजमाप ठरेल.
४० डॉप्लर रडारच्या माध्यमातून माहिती संकलन
भविष्यात हे नेटवर्क १०० रडार पर्यंत वाढवण्यात येणार
पूर्वी १० तास लागणार्‍या प्रक्रियेला आता केवळ ४ तास लागणार
स्थानिक पातळीवर २ तास आधीच अंदाज शक्य

हवामान बदलांचा अचूक अभ्यास शक्य
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी सांगितले की BFS प्रणालीमुळे लहान पर्जन्य घटनांपासून मोठ्या चक्रीवादळांपर्यंत प्रत्येक हवामान बदलाचे अधिक अचूक आणि वेळेवर विश्लेषण करता येईल.

शेतकर्‍यांसाठी दिलासा
भारताची कृषी अर्थव्यवस्था प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून आहे. या प्रणालीमुळे शेतकर्‍यांना पेरणी, खत व्यवस्थापन, काढणी आणि कीड नियंत्रण याबाबत अधिक अचूक माहिती मिळणार आहे. परिणामी, उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

error: Content is protected !!