सर्व कॉल्स रेकॉर्ड होतील, तीन लाल टिक म्हणजे अटक? काय आहे सत्य

नाशिक । उद्यापासून फोन कॉल्स रेकॉर्ड होतील, व्हॉट्सअ‍ॅपवरील तीन लाल टिक म्हणजे शासनाने तुमच्यावर कारवाई सुरू केली आहे. अशा आशयाचे संदेश सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहेत. नागरिकांच्या मनात भीती पसरवणार्‍या या संदेशांमुळे अनेकजण संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, यासंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावा नंतर देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, प्रत्यक्ष युद्धाच्या बातम्यांपेक्षा अधिक गोंधळ सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे होत आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, एक्स (माजी ट्विटर) आणि इतर सोशल प्लॅटफॉर्म्सवर नागरिकांच्या मोबाईलमध्ये भरभरून फॉरवर्ड्स येत असून, त्यात युद्धस्थितीबाबत अतिरंजित किंवा चुकीची माहिती असते. त्यामुळे नागरीकांमध्ये अधिक संभ्रम होत आहे. आता व्हाटसअप, फेसबुक, एक्स या प्लॅटफॉर्म्स वापरकर्त्यांमध्ये एक मेसेज चांगलाच व्हायरल होत असून या मेसेजने सर्वांनाच धडकी भरली आहे.

व्हायरल मेसेजमध्ये काय आहे?
सर्व कॉल्स रेकॉर्ड होतील व जतन केले जातील.
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरवर लक्ष ठेवले जाईल.
चुकीचा मेसेज पाठवल्यास थेट अटक.
शासन तुमचे मेसेज “निळ्या व लाल टिक”द्वारे ट्रॅक करत आहे.
तीन लाल टिक = अटक व न्यायालयीन समन्स.

खरे की खोटे?
सायबर सुरक्षाविषयक तज्ज्ञ व गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी यासंबंधी ही संपूर्ण माहिती खोटी व अफवापूर्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर सोशल मीडिया कंपन्यांनीदेखील अशी कोणतीही टिक प्रणाली लागू केलेली नाही.

व्हॉट्सअ‍ॅपवरील टिक चिन्हांचा अर्थ:
एक ग्रे टिक: संदेश पाठवला आहे
दोन ग्रे टिक: संदेश पोहोचला आहे
दोन निळे टिक: संदेश वाचला आहे
तीन टिक किंवा लाल टिक: असा कोणताही संकेत व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अस्तित्वात नाही

गुन्हेगारी कारवाईचा धोका कुणाला?
जर कोणी खोट्या अफवा पसरवत असेल, चुकीची माहिती देत असेल, किंवा इतरांना घाबरवत असेल, तर त्या व्यक्तीवरच आयटी कायदा आणि सायबर क्राइम अंतर्गत कारवाई होऊ शकते.

सायबर पोलिसांकडून कारवाईचा इशारा
सायबर पोलिस विभागाने नागरिकांना इशारा दिला आहे की, अशा अफवांचे पुढे प्रसारण केल्यास खर्‍याच कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो. त्यांनी सांगितले की, अफवा पसरवणं हे सायबर गुन्ह्यांत मोडत असून IT कायद्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते.

सरकार आणि पोलिसांचे आवाहन
अफवांवर विश्वास ठेऊ नका
शंकास्पद मेसेज पुढे पाठवू नका
अधिकृत माहिती केवळ सरकारच्या वेबसाइट, PIB, किंवा अधिकृत ट्विटर हँडलवरूनच पहा
अशा मेसेजची स्क्रिनशॉटसह पोलिस किंवा सायबर क्राइम विभागाला माहिती द्या

error: Content is protected !!