नाशिक । नाशिक शहर तसेच जिल्हयातील काही पेट्रोल पंपावर शुक्रवारी सायंकाळी अचानक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. अचानक इतक्या मोठया प्रमाणात वाहन धारकांच्या रांगा लागल्याने नेमका काय प्रकार आहे हे पेट्रोल पंप चालकांच्याही लक्षात येईना. काही वेळात अक्षरशः पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी झाल्याने याबाबत माहिती घेतली असता पेट्रोल पंप चालकांनी संप पुकारल्याबाबतचा एक मेसेज सोशल मिडीयवर व्हायरल झाला अन पंपावर अक्षरशः झुंंबड उडाली.
शहरात अचानक पसरलेल्या या अफवेने शुक्रवारी सायंकाळपासून नाशिककरांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली. सोशल मिडिया आणि व्हॉट्सपच्या माध्यमातून पसरलेल्या या अफवेने वाहनधारकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी, शहरातील बहुतेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडीसुद्धा निर्माण झाली.
संपाच्या या भितीने अनेक वाहनधारकांनी आपली वाहने तातडीने पेट्रोलपंपांकडे वळवली. काही पेट्रोल पंपांवर तर एकाच वेळी शेकडो दुचाकी आणि चारचाकी गाड्या रांगेत उभ्या राहिल्याचे चित्र दिसून आले. काही पंप चालकांना तर गर्दी नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी बोलवावे लागले.
सध्या भारत पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात देशात सर्वत्र हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सोशल मिडीयावर विशेष लक्ष केेंद्रित केले गेले असतांना शुक्रवारी सायंकाळी नाशिकमध्ये सोशल मिडीयावर एक मेसेज व्हारल झाला ज्याव्दारे पेट्रोल पंप चालक संप पुकारणार असल्याची अफवा पसरली. त्यामुळे पंपावर एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
प्रतिक्रिया
पेट्रोल पंप चालकांनी कोणताही संप पुकारलेला नाही किंवा तसे नियोजनही नाही. त्यामुळे नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवून नये. पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. जिल्हयात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. हा केवळ गैरसमज आणि अफवा आहे.
विजय ठाकरे, अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन, नाशिक










