नाशिक । राज्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. प्रशासनामार्फत या बैठकीचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे खास नियोजन करण्यात येत आहे. बैठकीच्या नियोजनापासून ते मान्यवरांच्या जेवणाच्या मेन्यू पर्यंत सर्व काही खास असणार आहे. या बैठकीत चौंडीच्या विकास आराखडयाला मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जामखेड तालुक्यातील चौंडी येथे होत असलेली मंत्रिमंडळ बैठक ही अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे. परंतू प्रश्न हा आहे की, मंत्रीमंडळाची बैठक चौंडी येथे घेण्याचे नेमके कारण काय असा प्रश्न सर्वांच्याच मनात आला असेल. राजकीय दृष्टीकोनातूनही ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीतून काय असतील राजकीय गणिते जाणून घेवूया…
चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान. ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जन्मगावी बैठक घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या बैठकीत चौंडीच्या विकास आराखडयाला मंजूरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी आहे त्यापूर्वी ही बैठक होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत चौंडी विकास आराखड्यासाठी निधी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
प्रा. राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील जन्मस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून गुजरात मधील ‘स्टॅचू ऑफ युनिटी’ प्रमाणे चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या ‘स्टॅचू ऑफ वुमन एम्पॉवरमेंट’ पुतळा उभारण्याबाबत तसेच त्यांच्या प्रेरक जीवन कार्याची माहिती येणार्या पिढ्यांना व्हावी, या दृष्टीने संग्रहालय बनविण्यासंदर्भात निर्णय देखील या बैठकीत होउ शकतो. तसेच अहिल्यादेवींच्या जन्मगावातूनच महिलांसाठी स्वतंत्र धोरण आखण्याचीही मागणी करण्यात येत आहे.
चौंडी हे रोहित पवार यांच्या पारनेर मतदारसंघालगतचं गाव असल्यामुळे, या ठिकाणी होणार्या बैठकीकडे राजकीय दृष्टीकोनातूनही पाहिले जात आहे.विधानपरिषदेचे सभापती पद मिळताच राम शिंदे यांनी कर्जत नगरपंचायतीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. तत्पूर्वी शिंदे यांचा याच विधानसभा मतदारसंघात अवघ्या काही मतांनी झालेला पराभव जिल्हारी लागला होता. नगरपंचायतीमधील रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेला सुरूंग लावत राम शिंदे यांनी पराभवाची काही प्रमाणात परतफेड केली. कर्जतमधील सत्तांतराच्या घडामोडी सुरू असतांनाच अविश्वासा ठराव संबंधित कायद्यात राज्याच्या मंत्रिमंडळाने पुन्हा बदल केला. त्याच रात्री तो अंमलात आणला गेला. याचा फायदा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कसे बळ दिले जात आहे याचे हे उदाहरणच म्हणावे. या माध्यमातून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व सभापती राम शिंदे या जिल्हयातील दोन सत्ताकेंद्रात सुरू असलेल्या संघर्षातही शिंदे यांना सरकारकडून झुकते माप मिळत असल्याचा संदेशही या माध्यमातून दिला जात आहे.
रोहित पवार यांच्यासाठी संकेत
सरकारकडून जिल्ह्याच्या विकासाच्या घोषणा आणि योजनांची घोषणा केल्यास स्थानीय आमदाराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता. यापुढे रोहित पवार यांना अधिक आक्रमक राजकारण आणि लोकसंपर्क साधावा लागेल, अन्यथा मतदारांमध्ये त्यांच्या प्रभावावर परिणाम होऊ शकतो. पारनेर व अहमदनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसला नव्याने शक्तिनियोजन करावं लागणार.










