सोन्याच्या दरात जोरदार घसरण; काय आहे कारण ?

मुंबई । भारत आणि पाकिस्तान यांच्यात संभाव्य युद्धाच्या टांगती तलवारीने गेल्या काही आठवड्यांपासून देशातील आर्थिक वातावरणात अस्थिरता निर्माण केली होती. मात्र, हा तणाव आता निवळल्याने भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक संकेत दिसू लागले आहेत. याचा स्पष्ट परिणाम भांडवली बाजार आणि वस्तू वायदे बाजारावर झाला असून, विशेषतः सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

गेल्या २४ तासांत सोन्याचा दर तब्बल २३६५ रुपयांनी घसरून तो प्रति १० ग्रॅम ९४,२२८ रुपये इतका झाला आहे. काल बाजार उघडताना हा दर ९६,५९३ रुपये होता. केवळ एका दिवसात सोन्याच्या किमतीत इतकी मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे, तर सामान्य ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

युद्धाची छाया दूर; बाजाराला दिलासा
भारत-पाकिस्तान तणाव निवळल्याने देशांतर्गत अस्थिरतेचा धोका कमी झाला आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित आश्रय मानल्या जाणार्‍या सोन्यातून पैसे काढून शेअर बाजारात वळवण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, मागणीतील घट आणि विक्रीच्या दबावामुळे सोन्याचे दर कोसळले आहेत.

अमेरिका-चीन संबंध सुधारल्यानेही परिणाम
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र अलीकडेच या दोन महासत्तांनी ९० दिवसांच्या कालावधीसाठी नवीन आयात शुल्क स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे व्यापारी अस्थिरता काही अंशी कमी झाली असून, याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे.

फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची शक्यता
अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’ कडून व्याजदर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, डॉलर मजबूत झाला असून, गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी इतर पर्यायांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या मागणीत घट झाल्याने अनेकांनी नफा वसूल करत विक्रीचा मार्ग स्वीकारला आहे.

ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
सध्याचा काळ लग्नसराईचा असल्यामुळे सोन्याच्या दरातील घट ही सामान्य वर्गासाठी मोठी संधी ठरत आहे. काही आठवड्यांपूर्वीच सोन्याचा दर १ लाख २ हजार ७३ रुपये प्रति तोळा या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. त्या तुलनेत आत्तापर्यंत जवळपास ८ हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.

पुढे काय?
सोन्याच्या दरातील ही घसरण अजून किती दिवस टिकून राहील, हे जागतिक आर्थिक घडामोडी आणि भारतातील स्थैर्यावर अवलंबून असेल. तज्ज्ञांच्या मते, युद्धजन्य वातावरण पुन्हा उद्भवले नाही तर दर आणखी खाली जाऊ शकतात.

error: Content is protected !!