शाळेच्या जागी विश्रामगृह? शाळेचे साहित्य हलवण्यास नागरिकांचा विरोध

नाशिक । शहरातील शालीमार जवळील पोस्ट ऑफिस जवळील बी.डी. भालेकर शाळा पाडून त्या जागेवर शासकीय विश्रामगृह उभारण्याचा घाट घातला जात असल्याने, शाळेचे माजी विद्यार्थी आणि ‘नाशिक वाचवा संघर्ष समिती’ यांच्या वतीने तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला आहे.

शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) शाळेतील साहित्य स्थलांतरित करण्याचे काम सुरू असताना जागरूक नागरिक आणि माजी विद्यार्थ्यांनी तातडीने शाळेत धाव घेत हे काम रोखले.

१९६८ साली ही शाळा तत्कालीन नगरपालिकेच्या काळात उभारण्यात आली. भालेकर यांनी स्वतः हातावर काम करून निधी जमवला आणि तो नगरपालिकेला देऊन विद्यार्थ्यांसाठी शाळा व मैदान उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती.

या रकमेवरूनच नगरपालिकेची पहिली माध्यमिक शाळा सुरू झाली. शाळेच्या मागे विद्यार्थ्यांसाठी विस्तीर्ण मैदान उपलब्ध करून देण्यात आले, ज्याला आजही नाशिककर ‘भालेकर मैदान’ म्हणून ओळखतात. अनेक गरीब आणि वंचित मुलांना या शाळेत शिक्षण घेऊन समाजाच्या प्रवाहात आणण्यात आले.

शाळेच्या जागी विश्रामगृह
गेल्या काही वर्षांपासून ही शाळा बंद आहे. महापालिकेकडून इमारत जीर्ण झाल्याचे सांगत पाडकामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच जागेवर शासकीय विश्रामगृह उभारण्याची योजना असल्याचे समजते.
मात्र या निर्णयाला शाळेचे माजी विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि संघर्ष समितीने कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यांनी या इमारतीची डागडुजी करून पुन्हा शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे.

शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आमचा लढा सुरू राहील
शाळेच्या अस्तित्वासाठी आम्ही लढा उभारला आहे. काही राजकीय नेत्यांनी ही शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. ही गोरगरीब विद्यार्थ्यांची शाळा आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. तरीदेखील अचानक शाळेचे सामान हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आम्ही हे काम रोखले असून, शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आमचा संघर्ष सुरू राहणार आहे.

  • दिपक डोके, माजी विद्यार्थी

शाळेच्या जागेवर महाविद्यालय सुरू करा
या जागेचा मूळ हेतू शैक्षणिक असल्याने तिचा वापर पुन्हा शिक्षणासाठीच व्हावा, अशी मागणी जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहातर्फे करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या शाळा सध्या फक्त इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मर्यादित आहेत. आठवी नंतर गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा संपते. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात किंवा खाजगी संस्थांकडे वळतात.

या पार्श्वभूमीवर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी शासकीय विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय स्थापन करण्याची गरज असल्याचे मत प्रसाद अरविंद भालेकर, प्रमुख – विद्यार्थी समूह यांनी व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!