तात्याराव सावरकरांची जन्मभूमी भोगतेय काळ्या पाण्याची शिक्षा

भगूर : भगूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आज भगूर गावात येणाऱ्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे पाणी रेल्वे बोगद्याच्या कामामुळे पाझरत असून, त्याचा योग्य निचरा होत नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी तिव्र शब्दांत नगरपालिकेला जाब विचारला आहे.

“तात्याराव सावरकर आजही काळ्यापाण्याची शिक्षा भोगत आहेत असं चित्र निर्माण झालं आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त करत नगरपालिकेच्या निष्क्रीयतेवर बोट ठेवलं.

रेल्वे प्रशासनाने बोगद्याचे काम केले खरे, पण त्यातून पाण्याचा पाझर होतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीतून रस्त्याचे आणि ड्रेनेजचे काम भगूर नगरपालिकेने एका बाजूने केले. मात्र दुसऱ्या बाजूने काम आतिक्रमणामुळे अर्धवट राहिले होते. त्या आतिक्रमणाची जबाबदारी प्रेरणा बलकवडे यांनी स्वतः घेत, ती हटवली आणि नागरिकांच्या सोयीसाठी स्वखर्चाने कच्चा रस्ता तयार करून दिला. पुढे आमदार सरोज आहिरे यांच्या निधीतून ट्रिमीक्स रस्ता पूर्ण करण्यात आला.

मात्र, मूळ समस्या अद्याप तशीच आहे. रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे बोगद्याच्या कामात पाणी पाझरत असून त्यासाठी योग्य ड्रेनेज व्यवस्था केलेली नाही. नगरपालिकेने केलेल्या ड्रेनेजची उंचीही चुकीची असल्याने पाणी वाहून जाऊ शकत नाही.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही बलकवडे यांनी केली आहे. तसेच, “पावसाळा होईपर्यंत हे पाणी काढण्याची जबाबदारी भगूर नगरपालिकेने घ्यावी, अन्यथा नगरपालिकेला टाळे लावून आम्ही ती जबाबदारी स्वतः घेऊ,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

error: Content is protected !!