नाशिक । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला. या निकालात आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. राज्यातील तब्बल १३६ शासकीय आश्रमशाळांचा तर १०४ अनुदानित आश्रमशाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.
आदिवासी विकास विभागाकडून ४९७ शासकीय तर ५५४ अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. दुर्गम आदिवासी भागातील मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळा हा एक प्रभावी पर्याय ठरतो आहे. या आश्रमशाळांच्या गुणवत्तावाढीसाठी विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परिणामी, यंदाच्या इयत्ता बारावीचा निकालात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे चित्र आहे. राज्यातील शासकीय आश्रमशाळांचा एकूण निकाल ९४.१५ टक्के इतका लागला. १३६ आश्रमशाळांचा निकाल शंभर टक्के आहे. त्यात कला शाखेच्या (५७) तर विज्ञान शाखेच्या (७९) आश्रमशाळांचा समावेश आहे. अनुदानित आश्रमशाळांचा निकाल ९२.४६ टक्के घोषित झाला आहे. १०४ आश्रमशाळांचा निकाल शंभर टक्के आहे. त्यात कला शाखेच्या (४७) तर विज्ञान शाखेच्या (५७) आश्रमशाळा आहे.
दरम्यान, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड यांनी विभागातील अधिकारी, मुख्याध्यपक, शिक्षक, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.
चौकट
विभागनिहाय १०० टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळा
विभाग-शासकीय-अनुदानित
नाशिक-४६-३८
ठाणे-३४-१०
अमरावती-३७-३७
नागपूर-१९-११
एकूण-१३६-१०४
आश्रमशाळांमध्ये शिकणार्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षांमध्येच नव्हे, तर विविध शैक्षणिक उपक्रमांतही आपले कौशल्य सिद्ध केले आहे. विभागातील अधिकारी, शाळा मुख्याध्यापक, शिक्षकांनी सातत्याने केलेले मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची चिकाटी आणि शाळेतील शिस्तबद्ध वातावरण यामुळे बारावीच्या निकालात यश मिळाले. पुढील वर्षी सर्वच आश्रमशाळांचा १०० टक्के निकाल लागण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाईल.
-लीना बनसोड, आयुक्त
आदिवासी विकास आयुक्तालय








