नाशिक । शहरातील श्रमिकनगर गंजमाळ येथील भालेकर मराठी शाळा व मैदान तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी खासदार शोभाताई बच्छाव यांनी केली आहे. नाशिक वाचवा या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित निदर्शनात त्यांनी महापालिकेच्या कामकाजावर सडकून टीका केली व नागरिकांच्या विविध प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली.
मध्यवर्ती भागात गरीबांना शिक्षण घेणे दुरापास्त झाले असून, महापालिकेच्या भालेकर हायस्कूल व विद्यानिकेतन शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्या तातडीने सुरू करून गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय करण्यात यावी, असे आवाहन खासदार बच्छाव यांनी महापालिकेला केले.
शहरातील विविध भागांत स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची वारंवार उकरपाकर करणे, पाणी व ड्रेनेजसाठी निकृष्ट काम करणे यावर टीका करत त्यांनी संबंधित ठेकेदार, स्मार्ट सिटी कंपनी व अधिकार्यांवर शास्तीची मागणी केली. गंजमाळ सर्वे नं. २१७ मधील एकूण ३९७४.४५ चौरस मीटर क्षेत्र स्लम म्हणून घोषित करण्यात आले असून, येथील रहिवासी १९८२ पासून करपात्र आहेत. मात्र, त्यांना वारंवार नोटिसा देऊन त्रास दिला जात आहे. यावर उपाय म्हणून त्याच ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे देण्यात यावीत, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
२४ तास पाणीपुरवठ्याच्या नावाखाली बेजबाबदार पद्धतीने काम झाले आहे. त्यामुळे शहरात अर्धा तास सुद्धा शुद्ध पाणी मिळत नाही. अनेक भागांत घाणीचे पाणी नागरिकांना दिले जात आहे. याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई झाली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. त्याचप्रमाणे नदी प्रदुषण, महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आवाज उठवला.
यावेळी नाशिक वाचवा या आंदोलनाचे कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र बागुल, खासदार शोभा बच्छाव, शरद आहेर, आकाश छाजेड, ज्ञानेश्वर काळे, जयेश पोखळे, उध्दव पवार, ज्युली डिसूजा, सीमा बागुल, प्रीतीताई बागुल, सुरेश कबाडे, आशिष बागुल, बापू सातपुते, जितेंद्र बागुल, वसंत मणियार, अब्दुल्ला खान, इम्रान शेख, शाहबाज शेख, शबनम शेख, शबाना शेख, नंदा पवार, इरफान मिस्त्री, प्रसाद बागुल, विद्येश लाड, रुपेश धनगर, प्रशांत लाड, तरुण खत्री, सोनु खत्री व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.











