आमदार सीमा हिरेंची सोशल मिडीयावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत

नाशिक: शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र, बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी विरोध दर्शवला आहे. वरिष्ठांनी मात्र स्थानिकांना कानपिचक्या देत विरोध शमवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमदार हिरेंचा विरोध मावळला असे बोलले जात असतानाच आता आमदार हिरेंची सोशल मिडीयावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

बडगुजर यांनी दोन वेळा आमदार हिरेंविरोधात विधानसभा निवडणूक लढली आहे. त्यामुळे दोघांमध्ये मोठा राजकीय संघर्ष आहे. त्यातच बडगुजर यांच्याविरोधात झालेले आरोपही लक्षात घेता, त्यांचा पक्षप्रवेश झाल्यास पक्षाची प्रतिमा मलीन होईल, असे आमदार हिरेंनी सांगितले. आ. हिरेंसह माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बडगुजर यांच्या गुन्ह्यांची कुंडली देखील मांडली.

मात्र भाजपमधील काही नेते पक्षवाढीसाठी बडगुजर तसेच यापूर्वी पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसते. बडगुजर आणि त्यांच्या समर्थकांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देण्यात आली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी सत्ता स्थापनेसाठी भाजपने ‘शंभर प्लस’चे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी तुल्यबळ उमेदवारांना पक्षात घेण्यासाठी मोठी चढाओढ दिसून येत आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोध डावलून बडगुजर यांना पक्षात घेण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार (१७) रोजी बडगुजर व त्यांच्या समर्थकांचा मुंबईत प्रवेश सोहळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बडगुजरांना पक्षातून होणारा विरोध लक्षात घेता वरिष्ठांकडून स्थानिक नेत्यांची कानउघाडणी करण्यात आल्याचे समजते. मात्र असे असले तरी आमदार सीमा हिरे यांनी सोशल मिडीयावर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. ‘पक्षप्रवेशाचा विरोध अजून मावळलेला नाही, कृपया चुकीच्या बातम्या पसरवू नये’, अशी पोस्ट करत आमदार हिरेंनी आपला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

error: Content is protected !!